चार वाघांनी सोडले उमरेड-कऱ्हांडला

0
14

नागपूर दि.२३: उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून अचानक गायब झालेला ‘जय’ अजूनपर्यंत वन विभागाला गवसला नसताना आता पुन्हा इतर चार वाघांनी उमरेड-कऱ्हांडला जंगल सोडल्याची माहिती पुढे आली आहे.एकीकडे या जंगलातील चार (नर) वाघ बाहेर गेल्याचे संकेत मिळत असतानाच येथील पवनी वन परिक्षेत्रात मात्र एक नवीन वाघीण दाखल झाल्याची माहिती पुढे आली आहे. वन विभागाने येथे लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये ती वाघीण कैद झाली आहे. येथे यापूर्वी चांदी व टी-६ यांच्यासह पुन्हा एका वाघिणीचा अधिवास आहे. शिवाय यात आता पुन्हा एका नवीन वाघिणीची भर पडली असून, येथील एकूण वाघिणींची संख्या चारवर पोहोचली आहे. मात्र त्याचवेळी नर वाघांची संख्या ही नऊवरून पाचपर्यंत कमी झाली आहे.

माहिती सूत्रानुसार, आतापर्यंत या अभयारण्यात एकूण नऊ (नर) आणि चार (मादा) अशा एकूण १३ वाघांची संख्या सांगितली जात होती. परंतु मागील काही दिवसांत त्या नऊ (नर) वाघांपैकी चार वाघांनी येथून काढता पाय घेतला आहे.

विशेष म्हणजे, वन विभागातर्फे या अभयारण्यातील एकूण वाघांची संख्या मोजण्यासाठी मागील १२ नोव्हेंबरपासून कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून प्रगणना केली जात आहे. हा कार्यक्रम एकूण २५ दिवस चालणार असल्याची माहिती आहे. परंतु यात आतापर्यंत केवळ पाच (नर) आणि चार (मादा) अशा एकूण नऊ वाघांची येथे उपस्थिती आढळून आली आहे. ‘जय’ या वाघामुळे उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी पर्यटकांच्या रांगा लागत होत्या.

परंतु मागील वर्षी येथून ‘जय’ गायब होताच पर्यटकांनीसुद्धा या अभयारण्याकडे पाठ फिरविली. आता ‘जय’पाठोपाठ येथील इतर चार वाघसुद्धा दुसरीकडे निघून गेल्याचे सांगितले जात आहे.

जाणकारांच्या मते, मुळातच या अभयारण्याचे वनक्षेत्र कमी आहे. त्यातुलनेत येथे वाघांची प्रचंड संख्या वाढली होती. त्यामुळेच आता येथील वाघ दुसरीकडे आपला अधिवास शोधत असल्याचे बोलले जात आहे.