गट ‘अ’ च्या डॉक्टरांच्या बदल्यांचे अधिकार समितीला

0
16

गोंदिया,दि.02 : महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट ‘अ’ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ (वेतन श्रेणी रूपये १५,६००-३९,१००, ग्रेड पे ५,४००) तसेच रुग्णसेवा कर्मचाऱ्यांच्या (गट ‘ब’ ते ‘ड’) मधील जिल्हा अंतर्गत बदल्यांचे अधिकार परावर्तीत करण्यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने ३० नोव्हेंबर २०१६ ला शासन निर्णय जारी केला असून आता हे अधिकार सहा सदस्यीय समितीला जिल्हास्तरावरच प्रदान करण्यात आले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागातील महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ‘अ’ संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याचे अधिकार शासनस्तरावर आहेत. त्यामुळे स्थानिक निकड विचारात घेऊन संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली करू शकत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी शासनस्तरावर याबाबत वेळोवेळी पत्र व्यवहार करीत असतात. तसेच मंत्रीस्तरावर बैठका व विधी मंडळातही याबाबत चर्चा उपस्थित होते. सदर अधिकार किमान जिल्हास्तरापुरते जिल्हास्तरावरील अधिकाराच्या समितीस प्रदान केल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा अधिक प्रभावीपणे व आवश्यकतेनुसार वापरता येतील, यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे बदलीचे तसेच त्यासोबतच रुग्णसेवा कर्मचाऱ्याच्या बदलीचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीस सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहणार असून सदस्य म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक आयुक्त आदिवासी विकास विभाग यांचा समावेश राहील.