वाघाची कातडी प्रकरण : आरोपींची चौकशी सुरूच

0
7

गोंदिया,दि.02 : देवरी-चिचगड मार्गावर वाघाच्या कातडीची अवैध तस्करी करणाऱ्या तीन आरोपींच्या अटकेनंतर या प्रकरणात आरोपींची संख्या वाढतच गेली. तब्बल २२ आरोपींना यात अटक करण्यात आली. यापैकी मुख्य आरोपीसह इतर पाच आरोपींना गडचिरोली येथे अटक करण्यात आल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून त्यांची चौकशी सुरूच आहे.

गडचिरोली येथून अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी सुजान कोरची व त्यासह माणिक पुडो, रामजी दुर्रा, महादेव कल्लो, साईनाथ कल्लो, सावळराम नुरूटी यांचा समावेश आहे. वन्यजीव अधिनियम १९७२ च्या विविध कलमान्वये सर्व २२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. वाघ कातडी तस्करी प्रकरणातील सर्व आरोपी बेल मिळेपर्यंत ते न्यायालयीन कोठडीतच राहणार असून त्यांच्याकडून शिकार ते विक्रीपर्यंतची सर्वच माहिती घेण्यात येत आहे. ज्याने शिकार केली, ज्याच्या शेतात शिकार झाली, ज्यांनी वाहनावर मृत वाघाला वाहून नेले, ज्याच्या घरी ठेवण्यात आले, विक्रीसाठी संबंध बनविणारे आदि सर्वांना अटक करण्यात आलेली आहे. मात्र तपासात व चौकशीत हे आरोपी प्रोफेशनल शिकारी वाटत नसून ते अंधश्रद्धाळू वाटतात. कुठेतरी कातडीवर बसून पैशाची झळती करण्याच्या अंधश्रद्धाळू मानसिकतेत जीवन जगणारे असल्याचे ते म्हणाले.त्यातच नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान परिसरातील एक मादा व तिचे दोन बछडे दोन वर्षापासून बेपत्ता आहेत. दोन वर्षापूर्वी अर्जुनी-मोरगाव ते गडचिरोली या दक्षिण परिसरात सदर वाघिण दोन बछड्यांसह फिरत होती. या वाघिणीला बछड्यांसह अनेकांनी पाहिले. परंतु ती वाघिण अचानक बेपत्ता झाली. तेव्हापासून नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात व्याघ्रदर्शन होत नसे. मात्र सध्या दोन नर व एक मादा वाघ येथे दिसत आहे. मात्र हे कुठून आले याबाबत सध्या माहिती उपलब्ध नाही.