जगा आणि जगू दया – न्या.लध्दड

0
21

गोंदिया,दि.२ : जागतिक एड्स प्रतिबंध दिनाच्या निमित्ताने एड्स बाधित रुग्णांच्या मानव अधिकारांचे उल्लंघन होणार नाही याकडे विशेष लक्ष देवून सर्वांना जगा आणि जगू दया. असे मत जिल्हा न्यायाधीश ए.एच.लध्दड यांनी व्यक्त केले.
१ डिसेंबर रोजी महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते. या अभियानाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यायाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाच्या अभियान संयोजिका डॉ.सुवर्णा हुबेकर, एआरटी सेंटरचे डॉ.चौरसीया, एम सॅकचे संजय जानवळे, क्षयरोग अधिकारी डॉ.काळे, डॉ.परियाल उपस्थित होते.
जागतिक एड्स दिनानिमित्त एड्स रुग्णांना मुलभूत सुविधा देण्याबाबतची व भेदभाव संपुष्टात आणण्याची शपथ डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी यावेळी उपस्थितांना दिली. जागतिक एड्स प्रतिबंध सप्ताहनिमित्त आयोजित विविध उपक्रमांबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर यांनी विस्तृत माहिती देवून प्रत्येक युवक-युवतींनी स्वत:ची रक्त तपासणी दिशा सेंटरमध्ये जावून करुन घ्यावी असे यावेळी आवाहन केले.
डॉ.केवलीया म्हणाले, एड्समुक्त समाज निर्मितीसाठी सामुदायीक प्रयत्नांची गरज आहे. नैतिकता पाळा आणि एड्स टाळा असे सांगितले.
यावेळी जागतिक एड्स प्रतिबंध सप्ताह निमित्त निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्लोगन स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आयोजित केली होती, त्यातील विजेत्या शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे, ट्रॉफी व मेडल्स देण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. बाहेकर नर्सिंग महाविद्यालय, एम.जे.पॅरॉमेडिकल डीएमएलटी कॉलेज, जिल्हा परिचर्या कॉलेज, गर्ल्स कॉलेज व सरस्वती गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनींनी गोंदिया शहरातून चौका-चौकातून एड्स जनजागृतीच्या घोषणा देत माहिती पत्रकांचे नागरिकांना वाटप केले.
कार्यक्रमाचे संचालन गुरुप्रसाद पाखमोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.बंसोड, अनिल गोंडाणे, तृप्ती बाजपेयी, अपर्णा भगत, निलेश राणे, इंदूरकर व जिल्हा एड्स नियंत्रण केंद्राच्या सर्व पॅरॉमेडिकल स्टाफने सहकार्य केले.