महाराष्ट्राला दिव्यांगजन राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

0
14

नवी दिल्ली : अपंगांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळास राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट राज्य प्राधिकृत वाहिनीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय राज्यातील सात व्यक्ती आणि चार संस्थांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय अपंग दिनी विज्ञान भवनात दिव्यांगजन राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील ७८ व्यक्ती व संस्थांना १४ श्रेणींमध्ये राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत, राज्यमंत्री द्वय रामदास आठवले, कृष्णपाल गुर्जर आणि दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव एन.एस.भांग यावेळी उपस्थित होते.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाला देशातील सर्वोत्कृष्ट राज्य प्राधिकृत वाहिनीचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला. महामंडळाच्यावतीने राज्यातील बेरोजगार दिव्यांगांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे आणि त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम प्रभावीपणे केले आहे.अल्प दृष्टी प्रकारात लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील गजानन बेलाले यांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. श्री. बेलाले हे सध्या मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयात उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. श्री. बेलाले यांनी विविध कंपन्यांमध्ये रोजगार कार्यशळांच्या माध्यमातून २ हजारांहून अधिक दिव्यांगांना मार्गदर्शन केले आहे.

नागपूर येथील डॉ. महंमद इर्फानूर रहीम यांना चलन वलन विषयक दिव्यांगांच्या श्रेणीत उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानीत करण्यात आले. कमरे खालील सर्व अवयवाने अधू असणारे डॉ. महंमद इर्फानूर रहीम हे नागपूर येथील डागा स्मृती हॉस्पीटल मध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नागपूर परिसरातील विविध आरोग्य शिबीरांच्या आयोजनात त्यांनी सक्रीय सहभाग दिला.
नागपूर येथील राधा बोर्डे (इखनकर) यांना देशातील सर्वोत्तम दिव्यांग व्यक्तींच्या(गैर व्यवसायिक) श्रेणीमध्ये सन्मानीत करण्यात आले. वयाच्या तिसऱ्या वर्षीच श्रीमती बोर्डे यांना अंधत्व आले. अंधत्वावर मात करून त्यांनी अंध व्यक्तींसाठी दोन कौशल्य विकास संस्था उभारल्या. अंध व सर्वसामान्यांसाठी वाचनालय उभारले.
बहु दिव्यांग श्रेणीमध्ये पुणे येथील निशाद शहा यांना सन्मानीत करण्यात आले. बौद्धिक व श्रवण बहु दिव्यंगत्व ही कमजोरी न मानता श्री. शहा यांनी स्वयंरोजगाराची कास धरली. श्री. शाह हे पुणे येथील जानिव संघटनेच्या माध्यमातून फेरीवाल्यांच्या अधिकारांसाठी कार्य करीत आहेत.पुणे येथील अश्विनी मेलवाने यांना कर्ण बधिरांच्या श्रेणीत सन्मानीत करण्यात आले.अपंगत्वावर मात करून श्रीमती मेलवाने यांनी फॅशन स्टाइलीस्ट, प्रतिमा सल्लागार, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली.
मुंबई येथील योगिता तांबे यांना दिव्यांगत्वासह सर्वोत सर्जनशिल जेष्ट व्यक्तींच्या श्रेणीमध्ये सन्मानीत करण्यात आले. श्रीमती तांबे यांनी अंधत्वावर मात करून कलाकार व संगीत शिक्षीका म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांनी आपली कला सादर केली आहे.मुळच्या नागपूरच्या आणि सध्या दिल्लीत स्थायिक देवांशी जोशी यांना सर्वोत्तम दिव्यांग कर्मचारी म्हणून सन्मानीत करण्यात आले. मतीमंदत्वावर मात करून कु. देवांशी ने स्वयंरोजगाराची कास धरली आणि तरूणांसमोर आदर्श निर्माण केला.
दिव्यांगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील चार संस्थांचाही यावेळी सन्मान करण्यात आले. सेरेब्रल पाल्सी आजाराने ग्रस्त व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या लातूर येथील जनकल्याण समितीच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या ‘संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्राला’ यावेळी सन्मानीत करण्यात आले. केंद्राच्या मुख्याध्यापिका दिपा सुरेश पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. २००६ मध्ये स्थापन झालेल्या या केंद्राच्या माध्यमातून सेलेब्रल पाल्सी आजाराने ग्रस्त विद्यार्थ्यांवर स्वीच थेरपी, फिजीओथेरपी, ॲक्यूपेशनल थेरपी, वाटर थेरपीच्या माध्यमातून उपचार करण्यात येतो तसेच या विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण देऊन स्वावलंबाने धडे शिकविले जातात.
दिव्यांगाच्या मेहनतीने फुललेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील ‘सनराईस कॅन्डल्स’ या संस्थेला सन्मानीत करण्यात आले. संस्थेच्या उपाध्यक्ष निता भावेश भाटीया यांनी हा पुरस्कार स्वीकारला. संस्थेचे महाराष्ट्राबाहेर १३ राज्यांमध्ये शाखा असून २ हजार २८० दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यात १ हजार ६९३ पुरूष आणि ५८७ महिलांचा समावेश आहे.मुंबईतील विधीमंडळ भागात स्थित स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचा यावेळी सन्मान करण्यात आला. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अरूंधती भट्टाचार्य यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्टेट बँक मुंबई ने २ हजार ८८२ दिव्यांग व्यक्तींना बँकेत रोजगार दिला.
मुंबई येथील कुर्ला (पश्चिम) भागातील ‘एजीस लिमीटेड’ ला सर्वोत्तम गैर सरकारी संस्थेच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. संस्थेचे चिफ पिपल ऑफीसर एस.एम.गुप्ता यांनी पुरस्कार स्वीकारला. ‘एजीस लिमीटेड’ ही बाहय सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारतासह ९ देशांमध्ये ४३ ठिकाणी आपली सेवा देते. संस्थेने ७११ दिव्यांग कर्मचाऱ्यांना रोजगार दिला आहे जो संस्थेच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या १०.७५ टक्के एवढा आहे.