‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबणार-मुख्यमंत्री

0
9

शेतमालाचे चुकारे कॅशलेस पद्धतीने द्यावे

नागपूर, दि.16 : देशातील काळा पैसा बाहेर काढून अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी केंद्र शासनाने 500 व 1000 रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून
रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा पुढचा टप्पा हा देशातील जास्तीत जास्त व्यवहार कॅशलेस करणे असा आहे. त्याची सुरूवात देशाचा कणा
असलेल्या शेतकऱ्यांपासून सुरू झाली पाहिजे. कृषी निविष्ठा खरेदी करताना कॅशलेस पद्धत वापरल्यास शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक निश्चितच
थांबणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

शेतकऱ्यांनी रोखरहित व्यवहार करण्यासाठी कृषि निविष्ठा विक्री केंद्रांना पीओएस (पॉईंट ऑफ सेल) मशीन पुरविण्यात येणार आहेत.
कृषि विभाग व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रामगिरी’येथे कृषि केंद्र चालकांना पीओएस मशीनच्या वाटपाचा शुभारंभ मुख्यमंत्री
यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मुख्य
सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार, कृषि आयुक्त विकास देशमुख, स्टेट
बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक दिपांकर बोस, कृषि विभागाचे अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी, कृषी सेवा केंद्र चालक आदी यावेळी उपस्थित होते.

कृषी सेवा केंद्रांच्या माध्यमातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर कृषि निविष्ठा खरेदी करतात. ही सर्व खरेदी पीओएस मशीनच्या माध्यमातून ‘कॅशलेस’ पद्धतीने झाल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतमालाचे चुकारेही भविष्यात कॅशलेस पद्धतीने देण्याबाबत कार्यवाही पूर्ण करावी असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी मुख्यमंत्री यांच्या हस्ते पीओएस मशीनद्वारे खरेदी करतानाचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांना पीओएस मशीनचे वाटप करण्यात आले.