उत्कृष्ट संकल्पनांची शासन अंमलबजावणी करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
8

मुंबई, दि. २६ : ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ कार्यक्रमाद्वारे ५०० विविध महाविद्यालयांमध्ये विकासाच्या १२ घटकांवर संकल्पना मागविल्या असून उत्कृष्ट संकल्पनांची शासन अंमलबजावणी करणार आहे. वेगवेगळया कल्पना मांडण्यासाठी ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र हे हक्काचे व्यासपीठ असून यात प्रत्येकाने आपल्या कल्पना मांडण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

मुंबईतील पवई येथील आयआयटीच्या मूड इंडिगो फेस्टिव्हलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ या विशेष कार्यक्रमाचे उदघाटन केले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित आयआयटी विदयार्थ्यांबरोबर संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते https://transformmaharashtra.com/ या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर सूत्रसंचालक आणि ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छोटी मुलाखतही घेतली. या मुलाखती दरम्यान मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराला येथे उपस्थित विदयार्थ्यांनी दाद दिली.पुढील ५ वर्षात देशाला ‘कॅशलेस नेशन’ बनविण्यासाठी प्रत्येकाने सहभाग द्यावा, जेणेकरुन मजूर, शेतकरी आणि सर्वसामान्यांना याचा लाभ मिळेल. डिजिटल पेमेंटसला प्राधान्य देताना आजच्या तरुणाईने कॅशलेस भारत घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.