मृत वयक्तीच्या नावे उठविली एमआरईजीएसची मजुरी

0
24

गोंदिया: 26 :- सालेकसा पंचायत समिती अंतर्गत येणाèया पानगाव मुंडीपार येथील रोजगार सेवकाने महाराष्ट्र रोजगार ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर मृत व्यक्तीला दाखवून गैरव्यवहार केल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते पुरणलाल उके यांनी उघडकीस आणला आहे. रोजगार सेवक शोभेलाल मोहारे याने १७ डिसेंबर २०१३ रोजी मृत्यू पावलेल्या गोकूल अर्जुन नागपुरे यांना २०१५-१६ या वर्षात २४ दिवस कामावर दाखवून शासनाची दिशाभूल केली. त्याचप्रमाणे स्व कुटुंबातील सात सदस्यांना कामावर न जाता हजर दाखवून शासकीय निधीची उचल केल्याचे माहिती अधिकार कायद्यांतर्गत समोर आले आहे. मोहारे यांनी १७ एप्रिल २०१५ रोजी मृत गोकूल नागपुरेला मुंडीपार पांदन रस्ता, शॉपींग कॉम्पलेक्सच्या कामावर १२ दिवस तर ३ मे २०१५ ला परत १२ दिवस हजर दाखवून शासकीय निधीची उचल केली. सोबतच स्वत:च्या कुटुंबातील कु. अरुणा ओमप्रकाश मोहारे व ज्योती ओमप्रकाश मोहारे या दोन्ही मुली गोंदियाच्या पूंजाभाई पटेल अध्यापक महाविद्यालयात डी.एड.चे प्रशिक्षण घेत असतानाही त्यांचे नाव मे व जून मध्ये मस्टरमध्ये दाखवून रोजीची उचल केली आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करुन रोजगार सेवकासह या प्रकरणात सहभागी असलेला ग्रामसेवक, विस्तार अधिकारी मग्रारोहयोच्या अधिकारयावर फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणी पुरणलाल उके यांनी केली आहे. उके यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत घेतलेल्या या माहितीत ग्राम पंचायत मुंडीपारच्या ग्रामसेवकाने गोकूल अर्जुन नागपुरे यांचा मृत्यू १७ डिसेंबर २०१३ रोजी झाल्याचे लिहून दिले आहे. त्यानंतरही रोजगार सेवकाने त्यांना कामावर दाखवून मजूरी उचल केली आहे. अरुणा मोहारे हिला १२ दिवस, ज्योती ओमप्रकाश मोहारेला १२ दिवस ९ मे, २३ मे व ६ जून २०१५ रोजी कामावर दाखविले आहे. विशेष म्हणजे हा गैरप्रकार उघडकीस आणत असताना सालेकसा पंचायत समितीच्या एका सदस्याने अर्जदाराला माहिती देऊ नका कशाला सहकार्य करता अशी भूमिका बिडोओ समक्ष घेऊन सदर प्रकरणात रोजगार सेवकाला वाचविण्याचा प्रयत्न ही केल्याचे उके यांनी सांगितले.