दानवेंच्या लग्नात सावेंकडून खैरेंचा अपमान

0
4

औरंगाबाद,दि.03 – -खासदार आणि शिवसेनचे उपनेते चंद्रकांत खैरे यांना पहिल्या रांगेतून मागे बसण्याचा सल्ला आमदार अतुल सावेंनी दिला आणि खासदार खैरेंमधील शिवसैनिक जागा झाला. ‘हे दानवेंच्या घरचे लग्न आहे की भाजपचा सोहळा’, असा सवाल त्यांनी आमदार अतुल सावेंना केला. खासदार खैरेंना बसल्या जागेवरुन उठवले जात असल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला. खैरे आणि सावेंमध्ये यावरुन जोरदार शाब्दिक चकमक झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे यांचा येथील एका लॉनवर शाही विवाह सोहळा झाला. सत्तेत असल्याने या सोहळ्याचा थाट काही औरच होता.
खासदार दानवे यांच्या आमदार मुलाच्या लग्नासाठी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री हजर राहाणार यामुळे पहिली रांग या मान्यवरांसाठी राखीव होती.पहिल्या रांगेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे स्थानापन्न होणार होते. याशिवाय इतर व्हीव्हीआयपींजसाठी ही रांग आरक्षीत होती.खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मतदारसंघात हे लग्न होते. मंडपात आल्यानंतर ते पहिल्या रांगेत येऊन बसले.खैरे स्थानापन्न होताच औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे आले आणि त्यांनी, साहेब, तुमची खुर्ची मागे आहे असे म्हटले.यामुळे खासदार खैरे संतप्त झाले. ते म्हणाले, की हे दानवेंच्या घरचे लग्न आहे की भाजपचा सोहळा ? मी खासदार आहे.यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली.दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि फडणवीस मंत्रिमंडळातील पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर तिथे धावून आले आणि त्यांनी दोघांचीही समजूत काढली.खैरे खासदार आहेत. ते पहिल्या रांगेतच बसतील असे खोतकर म्हणाले. तेवढ्यात हरिभाऊ बागडे तिथे पोहोचले आणि ते स्वतः खैरेंच्या बाजूला जावून बसले. त्यानंतर वातावरण निवळले.