ज्येष्ठ आंबेडकरवादी लेखक डॉ. कृष्णा किरवले यांचा खून

0
8

कोल्हापूर, दि.03 – ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, मार्गदर्शक व शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. कृष्णा किरवले यांचा खून झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
डॉ. कृष्णा किरवले यांचा येथील राजेंद्रनगर परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीतील त्यांच्या राहत्या घरी खून झाल्याचे उघड झाले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून याप्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, फर्निचरचे पैसे न दिल्याच्या रागातून त्यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळते.
डॉ. कृष्णा किरवले यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून आंबेडकरांच्या विचारांचा देशभर जागर केला. तसेच, ते शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख होते. आंबेडकरी तत्त्वज्ञान, चळवळ व दलित साहित्याच्या भाष्यकारांमध्ये एक अग्रगण्य नाव म्हणून त्यांना ओळखले जात होते. याचबरोबर ते जळगावात झालेल्या 31 व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
डॉ. कृष्णा किरवले यांनी औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्यांच्यावर आंबेडकरी चळवळीचे संस्कार तेथेच झाले. 1967 पासून आंबेडकरी ऊर्जा देणा-या डॉ. गंगाधर पानतावणे संपादित अस्मितादर्श या वाङमयीन नियतकालिकातून त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली.