चंद्रपूर, लातूर व परभणी महानगरपालिकेसाठी 19 एप्रिलला मतदान

0
15

मुंबई, दि. 22 – चंद्रपूर, लातूर व परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून, 21 एप्रिल रोजी मतमोजणी केली जाईल. त्यासाठी संबंधित महानगरपालिका क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स.सहारिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
सहारिया यांनी सांगितले की, मुदत समाप्तीपूर्वी या महानगरपालिकांच्या निवडणुका घेणे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेची 29 एप्रिल, लातूर महानगरपालिकेची 20 मे आणि परभणी महानगरपालिकेची मुदत 15 मे रोजी संपत आहे. भारत निवडणूक आयोगाने 5 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभा मतदार संघाची मतदार यादी या महानगरपालिका निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. इच्छूक उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्रे 27 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत सादर करता येतील. नामनिर्देशनपत्रे रविवारी . 2 एप्रिलपर्यंत स्वीकारण्यात येतील. 28 मार्च रोजी गुढी पाडव्याची सुट्टी असल्याने त्या दिवशी नामनिर्देनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत; परंतु रविवारी 2 एप्रिल रोजी ती स्वीकारण्यात येतील.
त्याबरोबरच सांगली- मीरज- कुपवाड महानरपालिकेतील प्रभाग क्र. 22ब, जळगाव महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 24अ आणि कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 46 च्या रिक्तपदासाठीदेखील 19 एप्रिलला मतदान होईल. तसेच धुळे जिल्हा परिषदेच्या शिरूड (ता. धुळे) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या दानापूर (ता. तेल्हारा) निवडणूक विभागाच्या; तर अकोट (जि. अकोला) पंचायत समितीच्या कुटासा निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठीदेखील 19 एप्रिलला मतदान होणार आहे. 21 एप्रिलला मतमोजणी होईल.