‘मार्ड’चा संप मागे, मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

0
15

मुंबई, दि. 24 – ‘आयएमएम’पाठोपाठ ‘मार्ड’नेही संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. संप मागे घेत असल्याचं प्रतिज्ञापत्र मार्डने मुंबई हायकोर्टात सादर केलं आहे. उद्या म्हणजे शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कामावर रुजू होण्याचं आश्वासन मार्डच्या वतीने वकिलांनी कोर्टात दिलं आहे.
डॉक्टर उद्या कामावर आले नाहीत, तर सरकार किंवा मुंबई महापालिका त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करेल, असा इशारा मुंबई हायकोर्टाने आंदोलक डॉक्टरांना दिला होता. त्यानंतर मार्डने सकाळी आठ वाजेपर्यंत कामावर रुजू होण्याचं आश्वासन कोर्टात दिलं आहे.
हायकोर्ट तसेच मुख्यमंत्री दोघांनीही संपकरी डॉक्टरांविरोधात ताठ भूमिका घेतल्यानंतर डॉक्टरांनी अखेर नमती भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने संप मागे घेण्याची तयारी दाखवली होती. सोबतच आपण मार्डलाही संप मागे घेण्याची विनंती करणार असल्याचं आश्वासन इंडियन मेडिकल असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना दिलं होतं.