डॉक्टरांनी मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन

0
8

गोंदिया दि.२४: डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध करीत हे हल्ले बंद झाले पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने गुरुवारी २३ मार्चला शहरातून मूकमोर्चा काढून डॉक्टरांवर होणार्‍या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. दरम्यान सर्व डॉक्टरांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा केली.
डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या घटना संपूर्ण भारतात मोठय़ा प्रमाणात घडत आहे. जिल्ह्यातही वारंवार असे प्रकार घडतात. या संदर्भात वारंवार संबंधितांना अर्ज, निवेदने दिल्यानंतरही त्यासंदर्भात कुठल्याही ठोस उपाययोजना करण्यात येत नाही. दरवेळी केवळ आश्‍वासनांची खैरात देण्यात येते, असा आरोप करीत सर्वप्रथम राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी २0 मार्चपासून संप पुकारला. या संपात आता वरिष्ठ निवासी डॉक्टर, परीक्षा निवासी डॉक्टर आणि आवासी डॉक्टर यांनीही उडी घेतली होती.याच मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने गुरुवारी शहरातून मूकमोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टर, वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांनी रस्त्यावर उतरून मोर्चा काढला.या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन त्या ठिकाणी निवेदन सादर केले.