… तर पुन्हा रामलीलावर आंदोलन, अण्णा हजारेंचा इशारा

0
5

अहमदनगर दि. 29 :– तीन वर्ष केंद्रात मोदी सरकार येऊन उलटली असली तरी भ्रष्टाचार थांबलेला नाही, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. बुधवारी अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अण्णा हजारे यांनी यावेळी लोकपाल नियुक्तीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले. लोकपाल नियुक्त करण्याची इच्छा केंद्र सरकारला नाही. लोकपालाची नियुक्ती शक्य नसेल तर निदान राज्यांमध्ये लोकायुक्तांची नियुक्ती केली जावी. भाजपची सत्ता ज्या राज्यात आहे, तेथे लोकायुक्त नेमण्यात काय अडचण आहे, असा सवाल अण्णा हजारे यांनी मोदी सरकारला विचारला.
पूर्वीच्या सरकारने लोकपाल कायदा व्हावा यासाठी कायदा केला, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. जनतेच्या भावनांचा हा अपमान आहे. लोकांना वाटते की अण्णा हजारे गप्प बसले आहेत, पण आपण गप्प बसलो नाही. आता पुन्हा एकदा आंदोलन करावे लागेल असे वाटते. ते दिल्लीत जाऊन करण्यासाठी तयार आहे. माझे मनही मला सांगत आहे, पुन्हा एकदा आंदोलन कर. मी त्यासाठी तयार असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले. त्यामुळे मी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आंदोलनाची तारीख कळवणार आहे. या आंदोलनासाठी फेसबुक पेजही तयार करण्यात आले आहे. लोकांना हे फेसबुक पेज लाईक करून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही यावेळी अण्णा हजारे यांनी केले.