नक्षल्यांचा आज देशव्यापी बंद,आलापल्ली-भामरागड मार्ग बंद

0
20

गडचिरोली,दि.२९: दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी.एन.साईबाबा यांच्यासह सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्याच्या निषेधार्थ नक्षल्यांनी आज देशव्यापी बंद पुकारला आहे. आज नक्षल्यांनी तलवाडा गावाजवळच्या रस्त्यावर झाडे आडवी टाकून बॅनर बांधल्याने सकाळी आलापल्ली-भामरागड मार्गावरील वाहतूक ठप्प होती.
७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रा.जी.एन.साईबाबा, हेम मिश्रा, प्रशांत राही, महेश तिरकी व पांडू नरोटे यांना यूएपीए कायद्यान्वये जन्मठेपेची, तर विजयी तिरकी यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या घटनेचा निषेध करणारे बॅनर नक्षल्यांनी काही दिवसांपूर्वी एटापल्ली व भामरागड तालुक्यात लावले होते. त्यात २३ ते २९ मार्च पर्यंत निषेध सप्ताह व २९ मार्च रोजी देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्हाभरात तगडा बंदोबस्त ठेवला आहे. असे असतानाही आज आलापल्लीपासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या तलवाडा गावाजवळ नक्षल्यांनी झाडे आडवी टाकून बॅनर बांधले होते. यामुळे सकाळी १० वाजतापर्यंत आलापल्ली-भामरागड मार्ग बंद होता. नंतर पोलिसांनी झाडे बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. कोरची येथील बाजारपेठ व वाहतूक बंद मात्र, पोलिस दाखल झाल्यानंतर बाजारपेठ व वाहतूकही सुरळीत झाली.