बच्चू कडूंची शेतकरी आसूड यात्रा गुजरात सीमेवर रोखली!

0
20

नंदूरबार,दि.20 : आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गुजरातच्या सीमेवर आमदार बच्चू कडू यांची शेतकरी आसूड यात्रा अडवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगरमध्ये उद्या आसूड यात्रा पोहोचणार होती. पण, त्याआधीच आज नंदुरबारच्या नवापूर चेकपोस्टवर ही आसूड यात्रा रोखण्यात आली.यानंतर गुजरातच्या तापी जिल्ह्याच्या उच्छाल तालुक्यातील गताडी येथून पोलिसांनी आसूड यात्रा रोखली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वाद झाला.आसूड यात्रा घेऊन निघालेल्या आमदार बच्चू कडू यांना गुजरात पोलिसांनी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. कडूंसह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी फरफटत नेऊन ताब्यात घेतले. याचवेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार सुद्धा केला.

संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अडवणुकीचा निषेध केला.सध्या चेकपोस्टर गुजरात पोलिसांना प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.दरम्यान, शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकरी आसूड यात्रा काढण्यात आली आहे.गुजरात पोलिस लाठीचार्ज करीत असल्याचे चित्रीकरण पत्रकार करत असताना पोलिसांनी त्यांनाही धक्काबुक्की केली. कॅमेरे ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. शिवीगाळ करत हुज्जत घातली. पोलिसांनी दंडेलशाही करत आसूड यात्रा रोखली. यापुढे गुजरात पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.