विजेच्या नियोजनाचे काम शासनस्तरावर नव्हे तर महावितरणस्तरावर

0
14

मुंबई, दि.06 मे:- मागील दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात साधारणपणे 1500 मे.वॅ. भारनिमयन सुरू असून महावितरणकडून विजेचा दररोजचा मागणी पुरवठा यांचा ताळमेळ साधण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.  त्यामुळे हे भारनियमन तात्पुरते असून लवकर ते बंद होईल असे महावितरणने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.विजेच्याबाबत परिस्थितीनुसार नियोजन करावे लागते. महावितरणने सर्व स्त्रोतांकडून उपलब्ध असलेली वीज मागणी यांचा ताळमेळ घातला होता.  कोळशावर आधारीत संच बंद पडणे, कोळसा कमी उपलब्ध होणे आणि अचानक तांत्रिक कारणांमुळे वीजसंच बंद पडणे या तीन कारणांमुळे विजेच्या उलब्धतेत 3 हजार मे.वॅ.ची कमतरता निर्माण झाली.  पवन ऊर्जेतही मागच्यावर्षीपेक्षा यावर्षी 500 मे. वॅ. ची कमतरता आहे.

तापमानातील बदलामुळे एकूण 2 हजार मे.वॅ. ने विजेची मागणी वाढली आणि अंदाजे 3 हजार 500 मे.वॅ. विजेची उपलब्धता कमी झाली.  असे असूनही मागील 3 दिवसांपासून केवळ 1 हजार 500 मे.वॅ. पर्यन्तच मर्यादेत भारनियमन करण्यात येत आहे.कोळशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ करून घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून वेस्टर्न कोलफिल्ड लि.,(WCL) साऊथ इस्टर्न कोलफिल्ड लि., (SECL) मध्ये प्रयत्न सुरू आहेत. मा. ऊर्जामंत्री महोदयांनी स्वत: या प्रकरणांमध्ये लक्ष घातले असून मा. केंद्रीय कोळसामंत्री यांना कोळसा उपलब्ध करून देण्याविषयी विनंती केली होती.  त्यानुसार कोळशाच्या पुरवठ्यात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे.  तसेच तांत्रिक कारणांमुळे बंद असलेले काही संच सुरू करण्यासाठी युध्दपातळीवर सुरु असलेले प्रयत्न इतर स्त्रोतांमधून विजेची उपलब्धता वाढण्याची शक्यता लक्षात घेता सदर भारनियमन पुढील चार-पाच दिवसांत बंद होईल.  शासनस्तर किंवा ऊर्जामंत्रालयाच्या स्तरावर विजेच्या नियोजनाचे काम केले जात नाही तर महावितरणकडूनच विजेच्या नियोजनचे काम केले जाते.वरील सर्व बाबी लक्षात घेता विजेच्या नियोजनामध्ये कुठलीही कमतरता नसून सदर स्थिती ही अचानक उद्भवलेल्या घडामोडीमुळे निर्माण झाली आहे.