नांदेड जिल्ह्यातील पोटा बु.येथे उष्माघाताचा बळी

0
10

नांदेड,दि.16- जिल्ह्यात महिन्याभरापासून उष्णतेने अचानक पारा वाढला असुन 43 अंश स्लेसियसचा आकडा पार केला आहे. अश्या परिस्थितीत पोटाची खळगी भरण्यासाठी स्वयंपाकाच्या कामावर गेलेल्या एका ३० वर्षीय तरुण शेतमजुराचा उन्हाचे चटके लागल्याने मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मौजे पोटा बु.येथे घडली आहे. या घटनेमुळे पोटा बु. गावावर शोककळा पसरली आहे.

उष्णतेच्या लाटेबाबत तापमानात तीव्र वाढ झाल्यामुळे आरोग्य विभाग व प्रशासनाने उष्माघातापासून बचावाचे उपाय योजन्याच सुरुवातीपासून आवाहन केले आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून आभाळात दाटून येणारे ढगांच्या गर्दीमुळे आणि मृग नक्षत्राच्या तयारीसाठी शेतात शेतकरी, मजुरदार राबत आहेत. मौजे पोटा बु.येथील कैलास प्रल्हाद वच्चेवार नामक ३0 वर्षीय युवक हा शेतमजुरी, स्वयंपाकी यासह मिळेल ते काम करून कुंटुंबाची उपजीविका भगवायचा. उन्हाच्या तीव्रतेमुळे अंगाची लाही लाही होत असताना आज दि.१६ मंगळवार रोजी एका ठिकाणी मिळाले स्वयंपाकाचे काम आटोपून कैलास दुपारी घराकडे परत येत होता. दरम्यान ऊन जास्त असल्याने रस्त्यातील शेतीतील झाडाचा आसरा घेऊन झोपला. दरम्यान त्याने कसे तरी होतेय असे म्हणत फोनवरून घरच्यांना माहिती दिली. ताबडतोब घरच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी रूग्णालयात आणण्यासाठी शेताकडे गेलं, घेऊन येताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अचानक जाण्याने आई, पत्नी धाय मोकल्याने रडू लागली असून, त्याच्या मृत्यू पश्चात आई, पत्नी मुलगा ओंकार, मुलगी निकिता असा परिवार आहे. उष्माघाताने त्याचा बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, पोटा गावावर शोककळा पसरली आहे.