राज्यमंत्री दिलीप कांबळेची जीभ पत्रकारांवर घसरली, बुटाने मारण्याची भाषा

0
12
हिंगोली, दि. 27 – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यानंतर आता मंत्रिमंडळातले सामाजिक न्यायसारख्या महत्वाच्या खात्याचे राज्यमंत्री असलेले नेते दिलीप कांबळे यांनी पत्रकारांच्याविरोधात दमदाटीची भाषा वापरली. तूर खरेदीचा गोंधळ सुरू असताना राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे तिकडे फिरकलेही नव्हते. आता तीन दिवस शेतकरी संवाद कार्यक्रमासाठी आल्यानंतर जणू पिकनिकला आल्याप्रमाणे त्यांनी मोंढ्यात भेट दिली. शेतक-यांचे म्हणनेही ऐकून घेतले नाही. त्यामुळे सर्वच माध्यमांनी टीकेचा सूर आळवताच पालकमंत्र्यांनी तालुक्यातील माळहिवरा येथील सभेत पत्रकारांना चक्क बुटाने मारण्याची भाषा वापरली.
एकाचे पाकीट दिले की, दुसऱ्याच्या विरोधात लिहितील अशा पत्रकारांना जोड्याने मारले पाहिजे. आपण दंडूक्‍यावाले पोलिस व पत्रकारांना भीत नाही, अशी टीका पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी तालुक्‍यातील खंडाळा येथे आज (शनिवार) केली. या प्रकाराने पुन्हा एकदा पालकमंत्री दिलीप कांबळे वादात सापडले आहेत. मोंढ्यात ते फक्त एकाच शेतक-याचे ऐकून निघून गेल्याचे वर्तमानपत्रांतून छापून आल्यानंतर आपली निष्क्रियता लपविण्यासाठी मी जंगलाचा राजा आहे, हे सांगण्याची मला गरज नाही, अशी आत्मस्तुती कांबळे यांनी केली. तर आम्ही हारतुरे स्वीकारले तर तुझ्या पोटात का दुखतयं, असा एकेरी उल्लेख केला. तर पत्रकारांची जातच बांडगुळ असे म्हणत या पत्रकारांच्या जीवावर आमचे राजकारण आहे का?  पाकिटं दिली की, हे लगेच दुस-याचे. मी खरा आहे. मी कोणाला घाबरत नाही. दांडकेवाल्याला अन् लिहिणाºयांनाही. एखाद्याला जोड्याने मारेल, असे फुत्कार काढले.
त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बाजू मांडण्यासाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस बी. डी. बांगर यांनी तातडीने एक प्रसिध्दीपत्र काढून पालकमंत्र्याच्या विधानाचा विपर्यास केला जात असल्याचे म्हटले आहे. पालकमंत्र्यांना केवळ चुकीच्या पध्दतीने पत्रकारीता करणाऱ्याच्या बद्दल बोलले आहे ते सरसगट सर्व माध्यमांना लागू होत नाही. या उलट पालकमंत्र्यांना माध्यमामार्फत बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु आहे, अशी पून्हा टीका माध्यमावरच केली. त्यामुळे हा वाद अधीकच वाढला आहे.
13 मार्च रोजी कांबळे ब्राह्मणांबद्दल काय बोलले होते ?
राज्यात दलालाची दलाली बंद झालीये. त्यामुळे काही जण शासनाला बदनाम करण्याचं काम करतात. काल एवढा चांगला कार्यक्रम झाला. या राज्यातल्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला. त्यानंतर आम्ही निघून गेल्यानंतर घोषणाबाजी केली. हिंमत असेल तर माझ्यासमोर करा. मुस्काटात हाणले असते…मी ही दलित आहे मी काय ब्राम्हण आहे का ? हे सरकार दलालांच्या विरोधात आहे म्हणून काही जणांची पोटं दुखायला लागली.
वक्तव्याचा निषेध
पालकमंत्र्यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विविध पत्रकार संघटनांनी निषेध केला. रविवारी याबाबत जिल्हा प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात येणार आहे. तसेच पत्रकार आंदोलनाच्याही पवित्र्यात आहेत.