पिक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा-जिल्हाधिकारी भंडारी

0
19

हिंगोली,दि.01: खरीप हंगाम 2017-18 साठी शासनाने जिल्ह्यास 885 कोटी 25 लाख रुपयांचे पीक कर्ज वितरणांचे उद्दिष्ट दिले असून राष्ट्रीयकृत बॅंकांनी पीक कर्ज वितरणांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिल्या. खरीप हंगाम जवळ आल्याने जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आज येथील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेस प्रत्यक्ष भेट देवून पिक कर्ज वितरण बाबत आढावा घेतला. यावेळी हिंगोलीचे तहसीलदार श्री. विजय अवधाने यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी भंडारी म्हणाले की, सन 2016-17 मध्ये शासनाने जिल्ह्यातील 80 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 1 हजार कोटी 38 लाख रुपये पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्टापैकी 762 कोटी 90 लाख रुपये पीक कर्जाचे 1 लाख 32 हजार शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले होते. परंतू यावर्षी म्हणजे सन 2017-18 मध्ये 1 हजार कोटी 41 लाख रुपयांचे पीक कर्ज वितरणांचे उद्दिष्ट आहे. याकरीता सर्व बँकानी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2017-18 करीता पेरणीसाठी कर्ज उपलब्ध होईल याची काळजी घेत कर्ज वितरण करावे.
शेतकरी हा आपला अन्नदाता असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना अडचण निर्माण येता कामा नये. याकरीता सर्व बँकांनी संवेदनशील दृष्टीने शेतकऱ्यांचे हित सांभाळावे. लाभार्थी शेतकऱ्याला सुलभरीत्या कर्ज उपलब्ध करून देणे हे बँकांचे प्रथम कर्तव्य आहे, असेही जिल्हाधिकारी भंडारी यावेळी म्हणाले.
बँक व्यवस्थापक यांच्याकडून पीक कर्ज वितरणांची सविस्तर माहिती घेत पीक कर्जाचे वितरण वेगाने करण्याच्या सूचना ही जिल्हाधिकारी भंडारी यांनी यावेळी दिल्या. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत सामाजिक अर्थसहाय्य योजने अंतर्गत श्रावणबाळ योजनेचा निराधार लाभार्थ्यांना सुरु असलेल्या वितरणाची पाहणी ही जिल्हाधिकारी भंडारी यांनी यावेळी केली.