आश्रमशाळेतील 14 कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

0
11
गोंदिया,दि.1 : देवरीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालविल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील दोन अनुदानित आश्रमशाळा शासनाने बंद केल्या. या घटनेला दोन वर्ष लोटली. परंतु, शासनाने अद्यापही त्या 14 कर्मचाऱ्यांचे समायोजन केले नाही. यामुळे जगावे तरी कसे? असा पोटतिडकीचा प्रश्न उपस्थित करीत कर्मचाऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. यानुसार, आज १ जूनला देवरीच्या कार्यालयासमोर पोचून या 14 कर्मचाऱ्यांनी अंगावर राॅकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. देवरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आत्मदहन करणाऱ्या कर्मचारऱ्यांसह संघटनेच्या 3 पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत अटक केली.
आत्मदहनापूर्वी सदर कर्मचारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देवरीचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांच्याशी चर्चा केली. परंतु, चर्चा असमाधानकारक झाल्याने त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. या कर्मचाऱ्यांवर देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आत्मदहन करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांत एस.डब्ल्यू.चाचेरे, व्ही.बी.गुरूमार्गी, व्ही.एल.वाघमारे, ए.पी.शहारे, आर.एस.कुंभरे, जी.एस.फुंडे,ए.पी.मेश्राम, एल.एम.बावणे, एल.जी.करसाल, एम.एस.वानखेडे, ए.पी.टेकाम, यू. जी. गोरले यांचा समावेश होता. यापैकी सडक अर्जुनी येथील एल.एम.बावने यांनी अंगावर राकेल ओतून आग लावण्याचा प्रयत्न केला.  बावणे त्याला देवरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष बी.एस.फुंडे,सचिव विलास सपाटे व समन्वयक भरत मडावी यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
सडक अर्जुनी व दोडके जांभळी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जात होत्या. दोन वर्षापूर्वी शासनाने या शाळांची मान्यता काढली. अनुदान बंद केले.त्यामुळे दोन्ही शाळा बंद झाल्या. या शाळांतील १२ चतूर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे समायोजन रखडले आहे. नियमानुसार समायोजन होईपर्यंत वेतन देणे गरजेचे आहे. मात्र, तसे झाले नाही. तथापि, दोन वर्षापासून वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले. दैनंदिन गरजा पूर्ण करता येत नाही. उदरनिर्वाहाचा प्रश्नही गंभीर रूप धारण करू लागला. वयात आलेल्या मुलामुलींच्या लग्नाच्या विचाराने मन सैरभैर झाले. यातच आपले समायोजन करावे, म्हणून या कर्मचाऱ्यांनी आदिवासी विकास विभागाला अनेकदा पत्रव्यवहार केला. उपोषण, आंदोलने केलीत. परंतु, कोणालाही पाझर फुटला नाही. शेवटी हताश झालेल्या या कर्मचाऱ्यांनी ३१ मे पर्यंत समायोजन करा, अन्यथा १ जून रोजी देवरीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आत्मदहन करू, असा इशारा दिला होता.
त्यानुसार, त्यांनी आत्मदहनाआधी प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली असता प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांनी नागपूर येथील विभागाच्या अप्पर आयुक्तांशी चर्चा केली. त्यावर अप्पर आयुक्तांनी या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी 9 जून रोजी नागपूर येथे बैठक आयोजित करण्यात येत असल्याचे सांगत चर्चेसाठी त्यांना आमंत्रित केले. परंतु, या चर्चेने समाधान न झाल्याने त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.