जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फेकला भाजीपाला, दूध

0
13

अमरावती, दि. 01 –  संघर्ष, आत्मक्लेष आणि आसूड यात्रेतून शेतकऱ्यांच्या जीवनाचे विदारक वास्तव मांडूनही शासन निगरगट्टच आहे. त्यामुळेच जगाच्या पोषिंद्याला आता संपाचे हत्यार उपसावे लागले. झोपेचे सोंग घेऊन बळीराजाचे शोषण करणाऱ्या शासनाला जाग येत नाही, तोवर आता शेतकरी स्वत:पुरतेच पिकविणार, कोणताही माल बाजारपेठेत जाणार नाही, या शब्दांत प्रहारचे संस्थापक आ.बच्चू कडू यांनी गुरूवारी शेतकऱ्यांच्या संपाचा बिगूल फुंकला. भाजीपाल्यासह दुधाचे कॅन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतून प्रहारींसह शेतकऱ्यांनी शासनाविरोधातील रोष व्यक्त केला.

शासनाला यानंतरही जाग न आल्यास शेतकऱ्यांचा हा संप असाच सुरू राहील. संपकाळात शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला, दूध आदी माल शहरात विक्रीसाठी आणू दिला जाणार नाही. आंदोलनादरम्यान कोणतेही शेती उत्पादन शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास बाजार समितीमधील हा बाजारच उधळून लावू, असा इशारा यावेळी देण्यात आला.आंदोलनात आ.बच्चू कडू, प्रहारचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, मंगेश देशमुख, जोगेंद्र मोहोड, प्रदीप वडतकर, बल्लू जवंजाळ, पंकज जवंजाळ, राजेश भोंडे, गजेंद्र गायकी, दीपक धुरजड, प्रशांत आवारे, गजानन ठाकरे, दिलीप जवंजाळ, नंदी विधळे, संजय पवार आदींसह प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.