सावित्री नदी नुतन पुलाचे लोकार्पण- मुख्यमंत्री

0
10
सावित्री पुलाचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री व ना.गडकरी

अलिबाग दि. 5 : कोकण  रस्ते विकासाच्या महत्वाच्या कामांचे भुमिपूजन  व विक्रमी वेळेत पूर्ण झालेल्या सावित्री नदीवरील पुलाचे लोकार्पण हा ऐतिहासिक क्षण असून, कोकण विकासासाठी कटिबध्द असल्याचे  प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाड येथे केले. सावित्री नदीवरील नव्या पुलाच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता, राज्यमंत्री रविंद्र  चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे, खासदार अमर साबळे, आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, भरतशेठ गोगावले, प्रविण दरेकर, अवधुत तटकरे,निरंजन डावखरे, संजय कदम, महाड नगराध्यक्षा स्नेहल जगताप आदि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, विक्रमी वेळेत पूर्ण झालेल्या या पुलाच्या लोकार्पणाने या दुर्घटनेत मृत झालेल्यांना एक प्रकारची श्रध्दांजली अर्पण होत आहे. तसेच स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड पर्यंतच्या रस्त्याची कामे व देशाला प्रेरणादायी असलेल्या भारतरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या गावा पर्यंतच्या  रस्त्याच्याकामाचे भुमिपूजन हा खरोखरच एक ऐतिहासिक क्षण आहे. याचे श्रेय 21 व्या शतकातील विकसित भारत निर्माण करणारे मंत्री नितीनजी गडकरी यांना जाते.
त्यांना आम्ही विश्वास देतो की, कोकण विकासासाठी होत असणाऱ्या रस्त्यांसाठी लागणाऱ्या जमीन संपादनाचे काम आम्ही तातडीने संपवू. यासाठी सर्व मिळून एकत्रित पाठबळ देऊ. हा महामार्ग भविष्यात कोकणाच्या विकासासाठी महत्वाचा ठरणारा असून प्रसंगी कोकणचे भाग्य बदलणारा होईल.
सावित्री नदीवरील या पुलाचे काम राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्याबद्दल त्यांनी केंद्राचे आभार मानले. तसेच पूल दुर्घटनेनंतर बचाव व मदत कार्य केलेल्या सर्व घटकांचे आभार व्यक्त करुन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष पाठपुरावा करुन हे काम 165 दिवसातपूर्ण केल्याचे सांगितले.
श्री. गडकरी म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग हा माझा विभाग असल्याने महाड  येथे झालेल्या या पुल दुर्घटनेची जबाबदारी माझी आहे. असे स्पष्ट करुन ना.गडकरी यांनी विक्रमी वेळेत पूल पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसेच केंद्रीय व राज्यस्तरीय अभियंते, संबंधित कंत्राटदार यांचे अभिनंदन केले. सदरील पुलाची काही
दिवसांपूर्वी हवाईपाहणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले. कोकणच्या विकासासाठी मुंबई-गोवा रस्ता चौपदरीकरणांतर्गत असलेल्या महाराष्ट्रातील 12 पॅकेजेस पैकी इंदापूर ते वडपाले, वीर ते भोगाव खुर्द व भोगाव खुर्द ते कशेडी घाट पर्यंतच्या रस्त्यांची कामे या तीन पॅकेजेसचे भुमिपूजन आज संपन्न होत आहे, त्याचा आनंद होत असल्याचे ते म्हणाले. तसेच  आवश्यक  असलेल्या जमिनींचे संपादन महाराष्ट्र शासनाने तातडीने करुन दिल्यासडिसेंबर 2018 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.