नांदेड महापालिकेचा कारभार पारदर्शक करू – आयुक्त गणेश देशमुख

0
11

नांदेड,दि.07 – महानगरपालिकेच्या कामकाजाची माहिती गेल्या दोन दिवसांमध्ये घेतली आहे. महापालिकेतील सर्व कामे नियमांनुसार आणि पारदर्शकपणे करू असा विश्वास नांदेड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

आयुक्त गणेश देशमुख यांनी शनिवारी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. गेली 21 वर्षात कोल्हापूर, डोंबिवली, मिरा भाईंदर, अंबरनाथ या महापालिकांमध्ये विविध पदांवर काम केल्याचा अनुभव आहे. पदाच्या आयुक्तपदाची सुत्रे शनिवारी स्वीकारल्यानंतर शहरातील 60 टक्के भागाची पाहणी केली. तसेच महापालिकेतील मुख्य इमारतीमधील विभागांशी संपर्क साधला. यावेळी 9 लेटलतिफ आढळून आले आहेत. त्यांना कारणे दाखवा नोटीसा बजाविल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी शिस्त आणि नियम पाळणे जरूरी असून जे कार्यालयीन नियम पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षीत असल्याचे ते म्हणाले. शहरातील सर्वात मोठा आणि ज्वलंत कचऱ्याचा प्रश्न आहे. कचरा आणि स्वच्छतेचा बाबतीत सुधारणा करण्यासाठी काही वेळ द्या स्वच्छतेचा प्रश्न आपण निकाली काढू असा विश्वास त्यांनी दाखविला. तसेच महापालिकेची बिकट आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठीही प्रयत्न करू, सौरउर्जेचा वापर अधिक व्हावा याकरीता सौरउर्जा प्रकल्पासंदर्भात प्राधान्याने लक्ष देणार असून शहर बस वाहतुकीच्या प्रश्नासंदर्भात लवकराच आढावा घेणार आहे. नांदेड शहर सुरक्षीत शहर योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमरेच्या संदर्भात पोलिस अधिकाऱ्यांशी बैठक झाली असून दुरूस्तीचा विषय आहे. त्या संदर्भात लवकर कारवाई केली जाईल. शहरातील काही भागात फेरफटका मारला असता शहर वाहतुकीच्या विषयामध्ये सुधारणा करण्यासाठी काही उपक्रम आहेत. शहरातील रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या सायकल ट्रकचा वापर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. महापालिकेची सर्व कामे नियमांनुसार ई-टेडरिंगनुसारच झाली पाहिजे असेही आयुक्त देशमुख यांनी सांगितले. शहरातील दुषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असून नांदेडकरांना शुद्ध पाणी पुरवठा कसा होईल याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल. यासर्व गोष्टी करण्यासाठी काही काळ वेळ द्यावा लागेल. जे काही चांगले काम केले त्याबद्दल भरभरून लिहावे व जिथे कामात त्रुटी आढळून आल्या त्या सुद्धा दाखवून द्यावेत अशा सांगून आयुक्त देशमुख म्हणाले की, आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर आताच काय केले ते सांगण्यापेक्षा काम केल्यानंतरच काय काम केले हे सांगेल असे रोखठोक उत्तर त्यांनी पत्रकारांना दिले.