मध्य प्रदेशात फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, 18 ठार

0
9
बालाघाट, दि. 06 –  मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील  येथील एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट होऊन 18 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली.
बालाघाटमधील खैरी गावामध्ये असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात आज दुपारी अचानक स्फोट होऊन लागलेल्या आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, 10 जण जखमी झाले आहेत.घटनेवर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दुःख व्यक्त केले आहे.त्याचप्रमाणे बालाघाटचे पालकमंत्री व कृषीमंत्री गौरीशंकर बिसेन हे देवास येथील कार्यक्रमासाठी गेले असता घटनेची माहिती मिळताच लगेच त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द करीत त्यांनी बालाघाटकडे प्रस्थान केले आहे.मृतकाच्या कुटुंबियाना प्रत्येकी 2 लाखाची मदत व जखमींना 50 हजाराची आर्थिक मदतीची घोषणा मध्यप्रदेश सरकारने केली आहे.
 बालाघाटमधील जिल्हाधिकारी भरत यादव यांनी सांगितले की, फटाक्याच्या कारखान्यातून मृत्यदेह बाहेर काढण्याचे काम काम सुरु असून जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप कारखान्यात दोन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य सुरु आहे. जिल्हाधिकारी कार्यलयापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर हा फटाका कारखाना असून ही दुर्घटना घडली, त्यावेळी फटाका कारखान्यात कामगार काम करत होते, असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आग कशामुळे लागली याचा तपास सुरु आहे.सर्व मृतदेह बालाघाट येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.