नागपूरात राज्यस्तरीय प्राचार्य अधिवेशन ९ आणि १० जुलै रोजी

0
8

नागपूर,दि.06-राज्यभरातील खासगी कॉलेजेसचे प्राचार्य येत्या ९ आणि १० जुलै रोजी नागपुरात एकत्र येणार असून उच्च शिक्षण आणि कॉलेजेसशी संबंधित विषयांवर यावेळी चर्चा केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयील प्राचार्य महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन नागपुरात आयोजित करण्यात आले असून त्या ‌अध‌िवेशनात अनेक प्राचार्य सहभागी होणार आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, प्राचार्य फोरम आणि धनवटे नॅशनल कॉलेज यांच्यावतीने हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. केंद्रीय रस्ते, दळणवळण आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरुण शेळके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. केंद्रीय मानव संसाधन राज्य मंत्री महेंद्रनाथ पांडे, राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज मते, राष्ट्रीय प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुभाष ब्रह्मभट्ट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. बेंगळुरू येथील नॅकचे सल्लागार व समन्वयक डॉ. जगन्नाथ पाटील यांचे बीजभाषण होणार आहे.
उद्घाटन समारंभानंतर दुपारी २ ते ५ या वेळेत पहिल्या सत्रात ‘भारतीय उच्च शिक्षण पद्धतीची वर्तमान परिस्थिती’ या विषयावर डॉ. राजन वेळूकर व डॉ. राजू मानकर बोलतील. १० जुलै रोजी सकाळी ९ ते ११.३० या वेळेत डॉ. प्रमोद येवले, डॉ. टी.ए.शिवारे, डॉ. नंदकुमार निकम आणि डॉ. आर.जी.भोयर हे ‘नवीन विद्यापीठ कायदा आणि आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्रात सहभागी होतील. दुपारी १२ ते २ या वेळेत ‘उच्च शिक्षणाचे जागतिकीकरण’ या विषयावर चर्चा होईल. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही. कल्याणकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.पी. काणे या विषयावर आपली मते व्यक्त होतील. या अधिवेशनाच्या समारोपीय सत्रात शिक्षक आमदार नागो गाणार आणि आमदार प्रा. अनिल सोले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील, असे महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे यांनी  सांगितले.सौर ऊर्जा प्रकल्प, सभागृहाचे उद्घाटन
विद्यापीठ अनुदान आयोग आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त निधीतून धनवटे नॅशनल कॉलेज येथे नवे सभागृह आणि सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात आले आहे. शुक्रवारी ७ जुलै रोजी कॉलेजच्या सभागृहात सकाळी ११ वाजता या दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. राज्याचे ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या प्रकल्पांचे उद्घाटन होईल. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरुण शेळके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. महापौर नंदा जिचकार, सावनेरचे आमदार सुनील केदार, नागपूर सुधार प्रन्यासचे माजी विश्वस्त अनंत घारड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या शिवाय, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व पदाध‌िकारीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.