नगरसेवक मानधनात दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

0
9

गोंदिया,दि.15- राज्यातील महानगरपालिकाक्षेत्रातील नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज (शनिवार) घेतला आहे. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचे मानधन दुप्पटीपेक्षा अधिक वाढवून तब्बल 25 हजार रुपये तर त्या खालोखाल “अ’, “ब’, “क’ व ड वर्ग महापालिकेतील नगरसेवकांना मानधन मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक मानधनवाढीचा पाठपुरावा सुरू होता.
वाढत्या महागाईनुसार नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, असे ठराव राज्यातील महानगरपालिकांनी मंजूर करून वेळोवेळी शासनाकडे पाठविले होते. सर्वांत श्रीमंत समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या 2012 मध्ये मानधनात दहा हजार रुपयांवरून 25 हजार एवढी वाढ करण्याचा ठराव घेतला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना त्यानुसार पत्र देखील पाठविण्यात आले होते. मात्र नगरसेवकांच्या मानधनात वाढ झालेली नव्हती. दरम्यान नुकत्याच झालेल्या महापौरांच्या परिषदेत देखील याबाबतचा ठराव घेण्यात आला होता. त्यानुसार राज्य शासनाने राज्यातील 26 महानगरपालिकांमधील नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना सर्वाधिक 25 हजार रुपये मानधन मिळणार आहे.
असे असेल वाढीव मानधन

“अ’ प्लसवर्ग 25 हजार
“अ’ वर्ग 20 हजार
“ब’ वर्ग 15 हजार
“क’ व “ड’ वर्ग 10 हजार