अर्जूनीमोर तालुक्यात एक युवक पूरात वाहून गेला

0
8

गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव 108.4 व किशोरी 260.2 मंडळात पावसाची नोंद

अर्जुनी मोरगाव,दि.15- तालुक्यातील केशोरी नजिकच्या जरुघाटा येथे पावसाने कहर केला असून पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
अर्जुनी मोरगाव चे तहसीलदार बोंबार्डे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अर्जूनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली असून पूरपरिस्थिती बिकट बनली आहे. तालुक्यातील केशोरी जवळून वाहणाऱ्या जरुघाटा नाल्याला आलेल्या पूराचे पाणी नाल्यालगतच्या जरुघाटा गावातील अनेक घरात घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुका प्रशासनाने पूरग्रस्तांना नजीक शाळा आणि अंगणवाडी केंद्रात स्थलांतरित केल्याची माहिती तहसीलदार बोंबार्डे यांनी दिली आहे. सद्यःपरिस्थितीत आपदग्रस्तांना धान्याचा पुरवठा केला गेला असून आर्थिक मदत येत्या सोमवार पर्यंत देण्यात येणार आहे.
दरम्यान, गाढवी नदीच्या पुरात चिचोली/केशोरी येथील महेंद्र लांडगे नावाचा युवक वाहून गेला असल्याची माहितीसुद्धा श्री. बोंबार्डे यांनी दिली असून महेंद्रचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.यासाठी गोंदिया येथील आपदा निवारण कक्षातील पथकाला पाचारण करण्यात आले आहे. आज सकाळी गाढवी नदीला आलेल्या पुरात तीन नागरिक अडकले होते. त्या सर्वांना सुरक्षित काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.