दलालासह बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी कोंडले

0
12

नांदेड,दि.15 जिल्ह्यातील तामसा येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमध्ये अनुदान वाटपात दलालांच्या मुक्त वावरामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज (शनिवार) दलालासह जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कर्मचार्यांना कोंडून अन्याय सहन करणार नसल्याचा इशाराच दिला.त्यानंतर नांदेड येथील मुख्य कार्यालयातील सामान्य व्यवस्थापक एम.एम.चव्हाण हे तामसात दाखल होवून शाखा व्यवस्थापक दिलीप धोबे यांच्या विरुद्ध कार्यवाहीचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर बॅंकेचे कुलूप काढण्यात आले.
येथील मध्यवर्ती बॅंक शाखेत मागील पंधरवाड्यापासून विविध प्रकारचे अनुदान शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी प्राप्त झाले होते.पण शाखा व्यवस्थापक धोबे यांनी सुरवातीपासूनच दलालांना वितरण कारभारात मोकळीक दिल्यामुळेदलालांनी स्लीपा प्राप्त करुन शंभर ते ३०० रुपयांनी स्लीप शेतकऱ्यांना विकणे चालविले. विकलेली स्लीप संबंधित दलालाकडून भरुन घेण्याची सक्तीच असल्याचे आरोप होते.शेतकरी मोठ्या संख्येने बॅंकेत अनुदानासाठी खेटे घालत असतानाही बॅंकेतून अनुदान मिळत नव्हते.पंधरा दिवसांपासून शेतकऱ्यांना बॅंकेत प्रवेशच नाकारला जात होता. पण दलाल मात्र विनाव्यत्यय कुलूप खोलून बॅंकेत प्रवेश करुन एकदाच मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या स्लीप देवून अनुदान उचलत होते. दलालाच्या गटातील व खिशातील नोटांची बंडले बघून बॅंकेसमोर रोज गोंधळ व शिवीगाळ होत असायची. पण बॅंकेच्या व्यवस्थापकावर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. यामुळे शेतकरी मनातल्या मनात खदखदत होता. शतकऱ्यांच्या स्लीप गायब करुन त्यांना नाहक परेशान केले जात होते.या प्रकारामुळे शेतकरी संतप्त होता. बॅंकेतील अनागोंदी व दलालीचा कळस होण्यामुळे अखेर शनिवारी शेतकरी कमालीचे आक्रमक झाले. संतप्त शेतकऱ्यांनी बॅंक सुरू होताच बॅंकेला कुलूप ठाेकले. या वेळी बॅंकेत दोन कर्मचारी व काही दलाल होते. शेतकऱ्यांच्या आक्रमक पावित्रयामुळे अधिकारी घाबरले. या वेळी बॅंकेचे अध्यक्ष व कार्यकारी व्यवस्थापक यांच्या कारभाराचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात आला. भाजपचे माजी शहराध्यक्ष दीपक देशमुख यांनी बॅंकेच्या नांदेड कार्यालयाशी संपर्क करुन येथील भ्रष्टाचाराची माहिती देवून कुलूप ठोकण्याची कृती कळविली. बॅंकेच्या मुख्य कार्यालयाने ताबडतोब सामान्य व्यवस्थापक एम.एम.चव्हाण यांना येथे पाचारण केले.घटनास्थळी पोलिस उपनिरिक्षक सचिन येवले हे पोलिसांसह दाखल झाले होते. पोलिसांनी देखील व्यवस्थापकाच्या ढिसाळ कारभारावर खंत व्यक्त केली.