मुंबईत मुसळधार पावसामध्ये 19 जणांचा मृत्यू, 16 जखमी

0
8

मुंबई, दि. 30 – मुंबईला मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. सर्वत्र हाहाकार उडवून देणा-या या पावसामुळे एकूण 19 जणांचा मृत्यू झाला असून, 16 जण जखमी झाले आहेत. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. या पावसामध्ये रेल्वेशी संबंधित दुर्घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असून, 12 जण जखमी झाले आहेत.

मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. अनेक लोक वाहनं रस्त्यावर सोडून चालत घरी निघाले. बॉम्बो हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकरही दुपारी 4.30 च्या सुमारास प्रभादेवीला आपल्या राहत्या घराच्या दिशेने निघाले. एलफिस्टन पश्चिम भागात त्यांनी आपली गाडी सोडली. पण, त्यानंतर अजूनपर्यंत डॉ. अमरापूरकरांचा काहीच ठावठिकाणा नाही.

बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉ. भन्साळी कालपासून चिंतेत आहेत. कारण त्यांचे सहकारी डॉ. दीपक अमरापूरकर कालपासून बेपत्ता आहेत. अमरापूरकर काल सकाळी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी दैनंदिन सगळी कामं केली. पण दुपार होताहोता पावसाचा जोर वाढला. पाणी साचल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्यामुळे डॉ. अमरापूरकरांनीही घराकडे धाव घेतली.लोअर परेलपासून प्रभादेवीपर्यंत चालत जाऊन घर गाठण्याचा अमरापूरकरांचा विचार होता. त्यांनी गाडी सोडून दिली. गुडघाभर पाण्यातून वाट काढत अमरापूरकर चालत राहिले. पण ते घरी पोहोचलेच नाहीत.

लोअर परेलमधील काही निकटवर्तींयांच्या माहितीनुसार अमरापूरकर जवळच्या मॅनहोलमध्ये कोसळले. पाण्याचा निचरा व्हावा म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांनी मॅनहोलचे झाकण काढलं होतं. लोकांच्या माहितीसाठी त्यात बांबू लावला होता. पण अंदाज न आल्याने डॉ. अमरापूरकर त्यात कोसळले.