दहा हजारांपेक्षा अधिक बार सुरू होणार

0
5

मुंबई,दि.05 : महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती आणि कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाणाºया राष्ट्रीय व राज्य महामार्गावर बंद असलेली दारू दुकाने व बीअरबार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी घेतला. त्यामुळे राज्यातील १० हजाराहून अधिक मद्यविक्री दुकाने व मद्यालयांना दिलासा मिळणार आहे.
या महामार्गांवर ५०० मीटरच्या आतील दारू दुकाने/बार बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उत्पादन शुल्क विभागाने घेतला होता. त्यामुळे १ एप्रिल २०१७ पासून अशा दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले नाही. त्याचा फटका बसून राज्यात सुमारे १६ हजार दारू दुकाने/बार बंद झाले. अनेक दुकानदारांनी स्थानांतराची धडपड चालविली होती. मात्र, नंतर सर्वोच्च न्यायालयानेच असे स्पष्ट केले की महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाणाºया राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील दुकानांसाठी हा आदेश लागू नाही. हा दिलासा मिळाल्याने आता १६ हजारपैकी १० हजाराहून अधिक दुकाने सुरू होणार आहेत. त्यांच्या मद्यविक्री परवान्याचे नूतनीकरण शुल्क व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर केले जाईल, असे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त अश्विनी जोशी यांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.