शाळेच्या मार्गावर असलेले दारूचे दुकान हलविण्याची मागणी

0
9

अर्जुनी मोरगाव,दि.05-शाळेच्या मार्गावर असलेले दारूचे दुकान अन्यत्र हलविण्याची मागणी करीत विद्यार्थिनींनी नगर पंचायत कार्यालयासमोर ठिय्या दिला. आपल्या मागणीसाठी शाळेतील विद्यार्थिनी, शिक्षक व कर्मचाºयांनी १ तारखेला नगराध्यक्षांसह अन्य अधिकाºयांना निवेदन दिले.
सविस्तर असे की, अर्जुनी-मोरगाव येथील बहुउद्देशीय हायस्कूलच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरच ‘श्री साईराम’ देशी दारू दुकान आहे. सध्या ते दुकान बंद असले तरी न्यायालयाच्या आदेशावरून लवकरच सुरू होणार असल्याची शक्यता आहे. हे दुकान शाळेच्या १०० मीटरच्या आत असून सध्या बंद आहे. मात्र १ सप्टेंबरपासून न्यायालयाच्या आदेशावरून बंद असलेले दारू दुकान पुन्हा सुरू होणार आहेत. अशात मात्र विद्यार्थिनी व गावातील महिलांना मद्यपींच्या अपमानास्पद कृत्यांना सामोरे जावे लागते. शिवाय या प्रकारांचा त्यांना त्रास सहन करावा लागतो. शाळेतील कर्मचारीही व शहरातील नागरीक सुद्धा या दारू दुकानामुळे त्रस्त आहेत.
दारु दुकानाच्या या समस्येवर कायमचा तोडगा म्हणून येथील दारू दुकान अन्यत्र हलविण्यात यावे अशी मागणी बहुद्देशीय शाळेने केली आहे. यासाठी शाळेतील विद्यार्थिनींनी नगर पंचायत कार्यालयासमोर ठिय्या दिला. तसेच नगराद्यक्षांसह तहसीलदारांना निवेदन देत पालकमंत्री, शिक्षण आमदार, जिल्हाधिकारी आदिंना शाळेकडून निवेदन पाठविण्यात आले आहे.