माणूस घडविण्याचे बळ पुस्तकात- देवसुदन धारगावे

0
10

वाचन प्रेरणा दिन साजरा
गोंदिया,दि.१३ : ग्रंथ व पुस्तके वाचनामुळेच माणसे सुसंस्कृत व प्रगल्भ होत असतात. आयुष्यात आपण कसे घडायचे हे पुस्तकेच शिकवितात. त्यामुळे माणूस घडविण्याचे बळ पुस्तकात आहे, असे प्रतिपादन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त देवसूदन धारगावे यांनी केले.जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत सामाजिक न्याय भवन येथे १३ ऑक्टोबर रोजी माजी राष्ट्रपती भारतरत्न स्व. डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून श्री.धारगावे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण निरिक्षक सतीश वाघ, पोलीस निरिक्षक श्री.कोकणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे, जिल्हाधिकारी यांच्या मातोश्री हिराबाई काळे यांची उपस्थिती होती.
श्री.धारगावे पुढे म्हणाले, माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम हे सतत विद्यार्थ्यांसाठी झटत असत. ते सतत ज्ञानाच्या शोधात राहिले आणि ज्ञान वाटत राहिले. कोणतेही यश मिळ‍विण्यासाठी माणसाची तीव्र इच्छाशक्ती, प्रयत्न करण्याची गरज व दृढ आत्मविश्वासासोबतच प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव असली पाहिजे. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही म्हणून नेहमी चांगले कर्म करीत राहावे. आयुष्यात आलेली संधी वारंवार मिळत नाही, त्यामुळे प्रत्येकाने मिळालेल्या संधीचे सोने करावे. वाचन संस्कृती आज घराघरात रुजविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती भूत म्हणाल्या, प्रत्येकाने सतत ज्ञान आत्मसात करीत राहावे. आपण वर्तमानपत्रे, मासिके वाचावीत तसेच निसर्गाचे सौंदर्य व्यक्त करणारी पुस्तके वाचावित. अभ्यासापर्यंत मर्यादित न राहता अवांतर वाचन करावे. नेहमीच यश संपादन करण्याचे प्रयत्न करावेत असे त्या म्हणाल्या.श्री.कोकणे म्हणाले, ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा यांचे फार जवळचे नाते आहे. जेवढी पुस्तके वाचाल तेवढीच ज्ञानात भर पडते. योग्य वेळेस योग्य मार्गदर्शक मिळाला तर निश्चितच माणसाचे जीवन उज्वल होत असल्याचे त्यांनी सांगितले.श्रीमती काळे म्हणाल्या, पुर्वी वाचनासाठी पुस्तके नव्हती. परंतू आता बाजारात भरपूर प्रमाणात पुस्तके उपलब्ध आहेत. पुस्तके वाचल्याने ज्ञानात भर पडते. प्रत्येकाला वाचनाचा छंद असायला पाहिजे, त्यामुळे वाचन संस्कृती रुजविण्यास मदत होते. बालवयातच मुलांवर योग्य ते संस्कार दयावे. बालपणापासून मुलांवार वाचनाची सवय लावावी असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून श्री.ढोणे म्हणाले, माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिनङ्क म्हणून साजरा करण्यात येतो. १५ ऑक्टोबरला रविवार सुट्टी असल्यामुळे हा कार्यक्रम आज १३ ऑक्टोबरला साजरा करण्यात येत आहे. ज्ञानसंपन्न आणि माहिती समृध्द समाज घडविण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रचार, प्रसार व विकास व्हावा यादृष्टीने वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात येतो. जिल्ह्यात १९४ ग्रंथालये आहेत. आपला थोडासा वेळ जर ग्रंथ व पुस्तके वाचनास दिला तर निश्चितच वाचन संस्कृतीत भर पडेल. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पल्लवी दुधघरे हिने ‘जैसे ज्याचे कर्म त्याचे फळ देई ईश्वरङ्क हे गीत सादर केले, चेतन मेश्राम व मयुर ढोमणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रंथ प्रदर्शनाचे सुध्दा आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार शेषराव भिरडे यांनी मानले. कार्यक्रमास स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी तसेच वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.