एस.टी. कामगार मंगळवारपासून बेमुदत संपावर

0
18

नागपूर,दि.15 – महाराष्ट्रातील सर्व एस.टी. कामगार मंगळवार १७ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी नागपुरात केली. कामगारांनी शासन आणि प्रशासनाच्या दडपशाहीला बळी न पडता या बेमुदत संपासाठी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचा प्रादेशिक मेळावा नुकताच नागपुरात झाला. संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे, केंद्रीय कार्याध्यक्ष सदाशिव शिवणकर आणि प्रादेशिक सचिव पुरुषोत्तम इंगोले यांची मेळाव्यात भाषणे झाली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विवेक पांढरकर होते. एस.टी. कामगारांना सेवाज्येष्ठतेनुसार पदंनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, ही कामगारांची मुख्य मागणी आहे. संप करावा की करू नये, यावर राज्यात सर्वत्र मतदान घेण्यात आले. बहुसंख्य कामगारांनी संपास कौल दिल्याने महामंडळ प्रशासनास याआधीच संपाचा इशारा दिला होता. शासनाने नंतर कामगार पुढारी सोडून प्रत्येक कर्मचार्‍यांचे म्हणणे जाणून घेतले. त्यानंतरही महामंडळाने निर्णय न घेतल्याने एस.टी.च्या सर्व संघटनांच्या पदाधिकार्‍यांची कृती समिती तयार झाली. या कृती समितीच्या बैठकीत १७ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हनुमंत ताटे, महाराष्ट्र इंटक वर्कर्स काँग्रेसचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, सरचिटणीस मुकेश तिगोटे, कनिष्ठ वेतन कर्मचारी संघटनेचे अजय गुजर उपस्थित होते. कृती समितीचा निर्णय महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या या मेळाव्यात सांगण्यात आला. प्रास्ताविक संघटनेचे नागपूर विभागीय सचिव अजय हट्टेवार यांनी तर संचालन राजू मुंडवाईक यांनी केले. आभार प्रशांत बोकडे यांनी मानले.