मोतीबिंदू शस्त्रक्रिया सप्ताहाला राज्यभर प्रारंभ

0
8

मुंबई(प्रतिनिधी)राज्यात राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमातंर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सप्ताह 23 ते 30 जानेवारी या कालावधीमध्ये होत असून या कार्यक्रमांतर्गत सुमारे 5 हजार शस्त्रक्रियांचे शासनाचे उद्दिष्ट आहे. अशी माहिती सार्वजनिक आरोग्यस व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज येथे दिली.

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया राज्यभर सुरू होत असून त्याचा शुभारंभ आज सर जे.जे. रूग्णालय येथे आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जे.जे.रूग्णालयाचे अधिष्ठाता पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, आरोग्य संचालक डॉ.सतीश पवार, सहसंचालक डॉ.साधना तायडे, नेत्र विभागाच्या प्रमुख डॉ.रागिनी पारेख, डॉ.तायडे, उपस्थित होते.

डॉ.सावंत म्हणाले, राज्यातील 84शासकीय रूग्णालयांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार असून यासाठी 129 नेत्रशल्य चिकित्सक, 660 नेत्रचिकित्सा अधिकारी कार्यरत राहणार आहेत. महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त व्हावा, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. आज त्यांच्या जयंतीदिनीच मोतीबिंदू शस्त्रक्रिया सप्ताहाचा शुभारंभ होत आहे ही आपल्यासाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे. मुंबईतील जे.जे. रूग्णातलय हे एक चांगले शासकीय रूग्णालय असून ते पंचतारांकित रूग्णालय व्हावे आणि गरिबांनाही आपण शासनाच्या पंचतारांकित रूग्णालयातून सेवा घेत आहोत यांचा अभिमान वाटावा, असे हे रूग्णालय व्हावे, यासाठी शासकीय स्तरावरून शक्य होईल ते प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

डॉ.लहाने म्हाणाले, आम्ही उरण येथील 57 व्या शिबिरात 180 रूग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली आहे. शासनाने निर्धारित केलेल्या 5 हजार मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या उद्दिष्टामध्ये आणखी 1 हजार शस्त्र्क्रियेची भर घालू. डॉ.दीपक सावंत हे स्वत: डॉक्टर असल्याने आणि आता आरोग्यमंत्री झाल्याने ते महाराष्ट्रातील आरोग्याचा व ग्रामीण रूग्णालयांचा कायापालट पुढील 5 वर्षात करतील. आमदार असतानाही डॉ.सावंत यांनी या रूग्णालयाला त्यांच्या आमदारकीच्या फंडातून अनेकदा भरघोस निधी देऊन गोरगरीबांच्या आरोग्याची काळजी वाहिली आहे. हे रूग्णालय अत्याधुनिक करण्यासाठी त्यांची मदत मोलाची ठरेल.

यावेळी उरण येथील गरीब रूग्णांना जे.जे रूग्णालयात दृष्टीदान देण्याच्या कार्यात योगदान दिल्याबद्दल नेत्रचिकित्सा अधिकारी श्री.सुभाष डवले यांचा आणून त्यांना सत्कार करण्यात आला. यावेळी रूग्णांना मोफत चष्म्यांचेही वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य संचालक डॉ.सतीश पवार यांनी तर सहसंचालक डॉ.साधना तायडे यांनी आभार प्रदर्शन केले.