भारतीय तिरंग्याला मानवंदना देणारे ओबामा पहिले अमेरिकी अध्यक्ष

0
20

वृत्तसेवा
नवी दिल्ली, २४ जानेवारी
यंदाच्या प्रजासत्ताकदिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारत दौर्‍यावर येणारे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारतीय तिरंग्याला मानवंदना देणारे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष आहेत.
याआधी अमेरिकेचे अनेक अध्यक्ष भारताच्या दौर्‍यावर आले होते. मात्र प्रजासत्ताकदिन समारंभासाठी येणारे ओबामा हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष आहेत. ओबामा यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. याआधी २०१० मध्ये ते भारत दौर्‍यावर आले होते. भारत दौर्‍यावर येणारे आयसेन हॉवर हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष होते. आपल्या दुसर्‍या कार्यकाळात म्हणजे १९५९ मध्ये ते भारतात आले होते. ९ ते १४ डिसेंबर या काळात ते भारत दौर्‍यावर असताना संसदेच्या संयुक्त अधिवेशन, तसेच रामलीला मैदानावरील एका जाहीर सभेलाही त्यांनी संबोधित केले होते. रिचर्ड निक्सन १९६९ मध्ये भारत दौर्‍यावर होते. ३१ जुलै ते १ ऑगस्ट असा त्यांचा दौरा होता. मात्र, त्याचा दिल्लीतील मुक्काम फक्त २२ तासांचा होता. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना जिमी कार्टर १९७८ मध्ये भारतात आले होते. कार्टर यांनीही संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. कार्टर यांच्या आईने दुसर्‍या महायुद्धाच्या काळात गुडगावनजिकच्या एका गावात शांतिपथकात काम केले होते. त्या गावालाही कार्टर यांनी भेट दिली होती. आपली आठवण म्हणून कार्टर यांनी गावकर्‍यांना टीव्ही भेट दिला. तेव्हापासून त्या गावाचे नाव कार्टरपुरी असे पडले आहे. बिल क्लिटंन यांनी २१ ते २५ मार्च २००० या काळात भारत दौरा केला होता. आपल्या मुलीसह त्यांनी जयपूर, मुंबई आणि हैदराबादला भेट दिली होती. जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी २००६ मध्ये भारताला भेट दिली होती.