राज्य शासनामार्फत ‘मंगेशकर स्कूल ऑफ म्युझिक’ उभारणार

0
16

मुंबई, दि 26 मंगेशकर कुटुंबीयांनी कायमच सामाजिक आशय जपला आहे. पंडित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून संवेदनशीलता टिकवून ठेवली आहे. व्यक्ती कलेने मोठा होतो, पण मला वाटते की मंगेशकर कुटुंबीय हे संगीतासह त्यांनी जपलेल्या सामाजिक संवेदनशीलतेच्या भावनेमुळे मोठे झाले आहे. त्यामुळेच प्रत्येक रसिकाच्या मनात मंगेशकर कुटुंबियांचे स्थान आहे, त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केले.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या संगीत कारकिर्दीला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने तसेच पंडित हदयनाथ मंगेशकर यांचा 80 वा वाढदिवस आणि हृदयेश आर्टसचा 28 वा वर्धापन दिन यांचे औचित्य साधून ‘अमृत हृदय – स्वर लता’ हा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.त्यावेळी कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, मंगेशकर कुटुंबिय आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, आज मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच भारतरत्न लता दीदींना भेटण्याचा योग आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हृदयनाथ मंगेशकर आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्यामध्ये बसण्याचा योग्य आला. याचा मनस्वी आनंद वाटतो. आज पंडितजींना 80 वर्ष पूर्ण झाली आणि लता दीदींच्या संगीत प्रवासाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मंगेशकर कुटुंबियांविषयी वेगळं सांगावं असं माझ्याकडे काही नाही. पण वेगवेगळ्या घटना घडल्या की आपल्याला लता दीदींनी गायलेली गाणी आठवतात. दुःखी माणसाची व्यथा सांगणारे, प्रेमी युगलांची भावना मांडणारे, देशप्रेमाची अशी वेगवेगळ्या प्रकारची गाणे लता दीदींनी गायली.भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात लता दीदी यांनी गायलेले, ‘ए मेरे वतन के लोगो’ गाणे ऐकल्यावर पाणी आले. खरे तर हे गाणे ऐकल्यावर प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी येते. 60 च्या दशकातल्या गाण्यांचा ऋणानुबंध अजूनही तसाच आहे. सैनिकांबद्दलचा गौरव, आपुलकी त्यांनी आजही तशीच ठेवली आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

राज्य शासनामार्फत सुरू करणार मंगेशकर स्कूल ऑफ म्युझिक
मंगेशकर कुटुंबियांचे सामाजिक योगदान अत्यंत मोठे आहे. त्यामुळे लवकरच राज्य शासनामार्फत ‘मंगेशकर स्कूल ऑफ म्युझिक’ सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी केली.

‘परफेक्शन’ आणि ‘पॉसीबील’ याचे जिवंत उदाहरण म्हणजे लता दीदी- जावेद अख्तर

याच कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक, कवी, गीतकार जावेद अख्तर यांना हृदयनाथ मंगेशकर पुरस्काराने गौरविण्यात आले. जावेद अख्तर यांना देण्यात आलेल्या हृदयनाथ पुरस्काराचे स्वरुप हे एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे आहे. पुरस्काराला उत्तर देताना जावेद अख्तर म्हणाले की, माझे काम शब्दांशी आहे. मला षणमुखानंदमध्येच माझ्या जंजिर या सिनेमासाठी पुरस्कार मिळाला आणि आज मंगेशकर कुटुंबियांकडून पुरस्कार मिळणे ही माझ्या कामाची पावती समजतो. ‘परफेक्शन’ आणि ‘पॉसीबील’ याचे जिवंत उदाहरण म्हणजे लता दीदी आहेत. मला गीतकार बनविण्यात लता दीदींचा मोठा वाटा असून ‘सिलसिला’ या सिनेमासाठी त्यांनी किशोर कुमार यांच्याबरोबर गायलेले गाणे आजही मला आठवते.माझ्या फोनमध्ये लतादिदींची 2000 हुन अधिक गाणी आहेत. भारताच्या बाहेरही लता मंगेशकर यांची गाणी ऐकली जातात, तेव्हा खऱ्या अर्थाने भारतीय असल्याचा आनंद होतो. लता दिदींचे गाणे हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण भागच बनला आहे.या कार्यक्रमात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.