जलयुक्त शिवार अभियानासाठी बोधचिन्ह रेखाटन स्पर्धा

0
16

मुंबई, दि.८:  ग्रामीण महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम करणाऱ्या शासनाच्या महत्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियानासाठी बोधचिन्ह (लोगो) रेखाटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या बोधचिन्हाचा वापर अभियानाचे अधिकृत बोधचिन्ह म्हणून करण्यात येईल.
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियानाची राज्यात व्यापक पातळीवर अंमलबजावणी सुरू केली. विकेंद्रित पाणीसाठ्यांच्या निर्मितीतून  शाश्वत सिंचनासह जमिनीतील आर्द्रता संरक्षित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या अभियानामुळे आतापर्यंत साडेअकरा हजार गावांमध्ये जलसंधारणाची चार लाखाहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. अभियानाच्या कामांमधून जवळपास १६ लाख टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून त्यातून २१ लाख हेक्टरहून अधिक सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. या अभियानास शेतकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून लोकसहभागातून झालेल्या कामांची किंमत ५७० कोटींपेक्षा अधिक आहे.
अभियानाच्या कामांचे नियोजन, अंमलबजावणी आणि सनियंत्रणातही नागरिकांचा सहभाग घेतला जात आहे. लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झालेल्या या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे भूजल पातळी, पाणी साठवण क्षमता, फलोत्पादन क्षेत्र, पिकांची उत्पादन क्षमता, चारा उत्पादन आणि जमिनीची आर्द्रता यामध्ये वाढ झाली आहे.
या स्पर्धेतील सहभागासाठी ३० नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी पाचपर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्याला १० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार असून स्पर्धेच्या अटी, शर्ती आणि तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती www.maharashtra.mygov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.