संविधान सन्मान दौडचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

0
16

मुंबई दि. 26 : – सामाजिक न्याय विभागाच्या वतीने वरळी सी फेस सी लिंक (जे.के कपूर चौक) ते चैत्यभूमी पर्यंत आयोजित केलेल्या संविधान सन्मान दौड आणि गौरव यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला.
या संविधान दौडच्या शुभारंभ प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले , सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, श्रीलंकेच्या राजदूत श्रीमती सरोजा सिरीसेना आमदार भाई गिरकर, सुनिल शिंदे, मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर, भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार धनराज पिल्ले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतीबा फूले आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच 26 नोव्हेंबर रोजी दहशतवादी हल्यातील शहीदांना श्रध्दांजली वाहिली. त्यांनतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या समवेत उपस्थित सर्व मान्यवर दौड मध्ये सहभागी खेळाडू व नागरिक यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केल्यानंतर मुख्यमंत्री यांनी संविधान दौडला झेंडा दाखवला व दौडची सुरवात झाली. याप्रसंगी सामाजिक न्यायमंत्री श्री. बडोले यांनी मुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांना संविधानाची प्रत भेट दिली.
“या देशाची शान ते आहे संविधान” या वाक्याने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरवात करुन ते म्हणाले आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्व श्रेष्ठ असे संविधान आहे. संविधानाच्या माध्यमातून समता, बंधूत्व, स्वातंत्र्य नागरिकांना मिळाले आहे. भारतीय संविधानाने एक व्यक्ती एक मत या तत्वाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसे जोडण्याचे काम केले आहे. केंद्रशासनाने डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिल येथील जमिन दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले म्हणाले की, डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोंव्हेबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना देशाला दिली, संविधानाच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, समता व बंधूत्वाच्या तत्वार देशाचा राज्यकारभार सुरु आहे. संविधानाने जनतेला मुलभूत अधिकार दिले आहेत. संविधानाबाबत जनतेमध्ये जाणिव जागृती व्हावी यासाठी संविधान दिनाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. आजची संविधान सन्मान दौड आणि गौरव यात्रेचे आयोजन यासाठी केले असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक न्याय विभागामार्फत वंचित्यांच्या विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.