अण्णांचा हल्लाबोल, म्हणाले नव्या टीममध्ये नसतील ‘संधीसाधू’

0
23

पुणे – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे त्यांच्या जुन्या सहकार्‍यांनी राजकारणाच्या वाटेवर जाण्याच्या निर्णयाने चांगलेच दुखावले आहेत. त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून अण्णांनी दिल्लीत आगामी काळात करणार्‍या नव्या आंदोलनाची रुपरेषा मांडली आहे. तसेच आता ‘संधीसाधू’ लोकांपासून दूर राहणार असल्याचेही म्हटले आहे.

अण्णांनी त्यांच्या https://annahazarethinks. blogspot.in या ब्लॉगवर असे लिहिले आहे की, केंद्रात भ्रष्टाचारावर अंकुश लावण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. त्याचमुळे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे आता आम्ही समविचारी लोकांना सोबत घेऊन आंदोलनासाठी एक नवी टीम तयार करणार आहोत.
बेदी आणि केजरीवालांना केले लक्ष्य
त्यांच्या या ब्लॉगच्या माध्यमातून अण्णांनी त्यांचे जुने सहकारी अरविंद केजरीवाल आणि किरण बेदींवर हल्ला चढवला आहे. अण्णांनी असे लिहिले आहे की, भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू होणारे हे आंदोलन पुढे नेण्यासाठी लवकरच एक टीम तयार केली जाणार आहे. पण यावेळी आमच्या टीममध्ये समर्पणाची भावना असणारे, निस्वार्थी लोक असावे आणि संधीसाधू लोक दूर राहावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
केंद्रातील सरकार ‘यू’ टर्न सरकार
अण्णांनी या ब्लॉगमध्ये केंद्रातील मोदी सरकावरही हल्ला केला आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत ‘यू’ टर्न घेतल्याचा आरोप करत अण्णांनी म्हटले आहे की, निवडणुकी दरम्यान ‘अच्छे दिन’ चा वादा करणारे सरकार शेतकरी आणि मजुरांसाठी बरे दिन घेऊन आले आहे. सरकारच्या अच्छे दिनच्या आश्वासनाचा फायदा केवळ काही ठरावीक उद्योगपतींना झाला आहे.
धार्मिक मुद्यावरून केंद्रावर टीका
ब्लॉगमध्ये धार्मिकतेच्या मुद्यावरून सरकार घेरण्यात आले आहे. एकिकडे सरकारकडून धार्मिक तणाव वाढवणारी वक्तव्ये येत आहेत, तर दुसरीकडे कामागर कायद्यात बदल करून कामगारांना बुरे दिन आणले आहेत. देशभरातील शेतकर्‍यांनी माझी भेट घेत भूसंपादन कायदा 2013 च्या नव्या अध्यादेशाच्या विरोधात आंदोलन करण्याची विनंती मला केली आहे.

सरकारचे ‘अध्यादेश राज’
सरकारने संसदेचे महत्त्व कमी केल्याचा आरोप अण्णांनी केला आहे. नवे सरकार अध्यादेश राज आणण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रपतींनीही यासंदर्भात चिंता व्यक्त केली असून, ते आम्हाला मान्य नाही, असे ते म्हणाले.

वचनभंग केल्याचा आरोप
लोकसभा निवडणुकांच्यापूर्वी भाजपने लोकपालचे समर्थन केले होते. पण केंद्रात सत्ता स्थापन झाल्यानंतर सरकार शांत झाले, असा आरोप अण्णांनी केला आहे.

नव्या टीममध्ये गोविंदाचार्य आणि जेठमलानी
सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे दिल्लीमध्ये निवडणुका झाल्यानंतर सरकारच्या विरोधात आंदोलनाचा बिगुल वाजवणार आहेत. दिल्ली निवडणुकांनंतर अण्णा त्यांच्या सहकार्‍यांच्याबरोबर चर्चा करून आगामी आंदोलनाच्या संभाव्य तारखेबाबात निर्णय घेणार आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानावर हे आंदोलन केले जाण्याची शक्यता आहे. यावेळी अण्णांच्या आंदोलनात भाजपचे माजी नेते गोविंदाचार्य आणि माजी खासदार राम जेठमलानी हेही असू शकतात.