दिल्ली निवडणुकीच्या रिंगणात तब्बल २३० कोट्याधीश उमेदवार

0
11

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत येत्या सात फेब्रुवारीला विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. दिल्लीतील ७० जागांसाठी सुमारे ६७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांपैकी तब्बल २३० उमेदवार हे कोट्याधीश आहेत. तर अनेकांच्या नावावर गुन्हेही दाखल आहेत.
दिल्लीतील राजौरी गार्डन मतदारसंघातून निवडणूक लढवणारे शिरोमणी अकाली दलाचे उमेदवार मजिंदर सिंग सिरसा यांच्याकडे सर्वाधिक २३९ कोटी रुपयांची संपत्ती आहे. आम आदमी पक्षाच्या परमिला टोकस यांचा कोट्याधीशांच्या यादीत दुसरा क्रमांक लागतो.
एकीकडे आम आदमीचे प्रतिनिधित्व करणारे आपचे ७० पैकी ४४ उमेदवार कोट्याधीश आहे. तर काँग्रेसचे ५९ आणि भाजपाचे ५० उमेदवारांकडे एक कोटीहून अधिक संपत्ती आहे. पहिल्या पाच कोट्यांधीशांच्या यादीत आपचे सर्वाधिक दोन उमेदवार आहेत तर शिरोमणी अकाली दल, काँग्रेस आणि भाजपाचा प्रत्येकी एक उमेदवार आहे.
निवडणूकीच्या रिंगणात कोट्याधीश उमेदवारांसोबत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचीही काही कमी नाही. २१०३च्या निवडणुकीत सुमारे १६ टक्के उमेदवारांच्या नावावर गुन्हे दाखल होते. यंदाच्या निवडणुकीत या प्रमाणात एका टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपाच्या ६० उमेदवारांपैकी ३९ टक्के उमेदवारांच्या नावावर गुन्हे दाखल आहेत. तर आपच्या ३३ टक्के आणि काँग्रेसच्या ३० टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. निवडणूक लढवणा-या उमेदवारांमध्ये एका उमेदवाराच्या नावावर तर हत्येप्रकरणीचा गुन्हा दाखल आहे.