जलक्रांतीचा इस्त्राईल पॅटर्न महाराष्ट्रात राबविणार- पंकजा मुंडे

0
16

मुंबई : इस्त्राईलचे मुंबईतील कौन्सूल जनरल डेव्हिड अकॉव्ह यांनी गुरूवारी मंत्रालयात ग्रामविकास व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. इस्त्राईलच्या धर्तीवर महाराष्ट्राला टंचाईमुक्त, दुष्काळमुक्त करणे तसेच अवर्षणप्रवण क्षेत्रातील शेतीमध्ये सुधारणा करणे आदी मुद्यांवर याप्रसंगी चर्चा झाली.

श्री. अकॉव्ह यांनी इस्त्राईलमध्ये राबविण्यात आलेल्या जलसंधारणविषयक विविध प्रयोगांची माहिती दिली. अत्यंत कमी पर्जन्यमान असूनही इस्त्राईल आज कृषी क्रांतीतील एक अग्रणी राष्ट्र ठरले आहे. यासाठी पाण्याचे सुक्ष्म नियोजन महत्वाचे ठरल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीमती मुंडे म्हणाल्या, महाराष्ट्रातील बहुतांश विभागांची भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थिती थोड्याफार फरकाने इस्त्राईलसारखीच आहे. त्यामुळे कृषीक्रांतीचा इस्त्राईल पॅटर्न महाराष्ट्रात राबविणे आवश्यक आहे. उपलब्ध पाण्याचे सुक्ष्म नियोजन करणे, पावसाचे वाहून जाणारे जास्तीत जास्त पाणी जलसंधारणाच्या विविध प्रयोगांमधून अडविणे, ठिबक सिंचन, तुषार सिंचनसारख्या यंत्रणांचा प्रभावी वापर करणे आदी प्रयोग कोणत्याही परिस्थितीत आपल्याला स्विकारावेच लागतील.

जलक्रांती आणि कृषीक्रांतीचा इस्त्राईल पॅटर्न हा राज्याच्या विशेषतः मराठवाडा, विदर्भ आदी दुष्काळी भागांसाठी मार्गदर्शक ठरु शकतो. राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यात जलक्रांती आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. यापुढील काळात इस्त्राईलकडून अधिकाधिक मार्गदर्शन घेऊन आपल्या राज्यातही कृषी आणि जलक्रांती आणण्यासाठी व्यापक प्रयत्न केले जातील, असे श्रीमती मुंडे म्हणाल्या.

कमी पाण्यावर भाजीपाला उत्पादन करण्यासाठी इस्त्राईलने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. भाजीपाला हे शेतकऱ्याला रोख पैसे देणारे साधन आहे. महाराष्ट्रातही भाजीपाला उत्पादन विकसित करण्यासाठी इस्त्राईलच्या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल. यातून शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.