हिंदीला विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाची भाषा बनवा- मुख्यमंत्री

0
19

-वर्धा : हिंदी ही भाषा साहित्य व संस्कृतीपर्यंतच मर्यादित न राहता तिला विज्ञान, माहिती व तंत्रज्ञानाची भाषा म्हणून विकास करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या हिंदीनगर परिसरात आयोजित 25व्या अखिल भारतीय राष्ट्रभाषा प्रचार संमेलनाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी साहित्यिक तसेच समीक्षक डॉ.सुर्यप्रकाश दीक्षित तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक हितवादचे प्रबंध संपादक तथा माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, खासदार रामदास तडस,आमदार डॉ.पंकज भोयर,राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रधानमंत्री डॉ.अनंत राम त्रिपाठी,स्वागताध्यक्ष सुर्यप्रकाश चौधरी, प्रचारमंत्री डॉ. हेमचंद्र वैद्य आदी उपस्थित होते.

श्री.फडणवीस म्हणाले की, देशाला जोडण्याचे काम हिंदी भाषेने केल्यामुळे हिंदीच्या प्रसार व प्रचार होणे आवश्यक आहे. मातृभाषामध्ये आकलन सहज होते,त्यामुळेच आकलनशक्ती वाढविण्यासाठी हिंदीमध्ये विज्ञान व साहित्याची निर्मिती व्हावी.युवा पिढीतील वाचनाची आवड कमी होत आहे, त्यासाठी नवीन साहित्य निर्माण होण्याची गरज आहे.

नागपूर येथे जागतिक हिंदी साहित्य संमेलन होण्याकरिता महाराष्ट्र शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल,यासाठी राष्ट्रभाषा प्रचार समितीने पुढाकार घ्यावा, पूर्वोत्तर राज्यातील विद्यार्थी राष्ट्रभाषा प्रचार समितीत येऊन हिंदी शिकतात आणि त्याचा प्रचारही करतात. समितीला याकामात शासनातर्फे संपूर्ण सहकार्य देण्यात येईल,अशी ग्वाही देत मुख्यमंत्र्यांनी आपला भाषणाचा शेवट रामप्रसाद बिसमिल्ला हयांची सुप्रसिद्ध काव्यरचनेने केला.

अध्यक्षीय भाषणात डॉ. दीक्षित यांनी हिंदीच्या विकासासोबतच संपूर्ण जगात प्रसार व प्रचारासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

श्री. पुरोहित म्हणाले, हिंदीला राष्ट्रभाषेचा सन्मान मिळावा यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. दक्षिणेतसुद्धा हिंदीचा प्रचार व प्रसाराचे काम राष्ट्रभाषा प्रचार समिती तर्फे सुरू असून भाषेचा संकोच न करता सर्वांनीच ही भाषा आत्मसात करावी. विदर्भात हिंदी भाषेच्या परीक्षेसाठी 65 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून देशात 15 हजार प्रचारक या भाषेच्या विकासासाठी व प्रचारासाठी कार्यरत आहेत.

यावेळी नामवंत साहित्यिक डॉ. सूर्यप्रसाद दीक्षित, डॉ.चित्तरंजन मिश्र, डॉ. दामोदर खडसे, डॉ.राम आहाद चौधरी, डॉ.शंकरलाल पुरोहित, डॉ.मफतलाल पटेल, डॉ.देवराज आदींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी एन. नवीन सोना,जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मिलिंद भेंडे,डॉ.दिलीप गोडे, माधव कोटस्थाने उपस्थित होते.