पंचगंगेच्या काठावर कॉम्रेडला लाल सलाम

0
11

कोल्हापूर -कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी पंचगंगेच्या काठावर सायंकाळी ६.१५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी हजारो लोकांनी या लढाऊ कॉम्रेडला शेवटचा लाल सलाम केला.
कॉ. पानसरे यांच्या हत्येमुळे जनमानसात निर्माण झालेल्या संतापालाही या अंत्ययात्रेत वाचा फुटली होती. हजारो लोक हत्येचा निषेध करताना निष्क्रिय सरकारला शिव्याशाप देत होते. शासकीय इतमामात अंत्यविधी झाला नाही, अंत्यविधीला राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहिले नाहीत याचाही निषेधाच्या घोषणा देऊन राग व्यक्त होत होता.
पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या कन्या स्मिता सातपुते, मेघा बुट्टे, स्नुषा मेघा पानसरे व नातवंडे मल्हार आणि कबीर पानसरे यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय लोटला होता. ‘कॉम्रेड पानसरे अमर रहे’ ‘कॉ. पानसरे लाल सलाम, लाल सलाम’अशा घोषणा दिल्या जात होत्या.
दरम्यान, त्यांच्या निधनामुळे शनिवारी सकाळी शहरातील व्यापारी व व्यावसायिकांनी व्यवहार बंद ठेवल्याने उत्स्फूर्त बंद पाळला. डावी आघाडी व संघटनांच्या वतीने रविवारी महाराष्ट्र बंद पाळण्यात येणार आहे. तसेच ११ मार्च रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खा.धनंजय महाडिक, खा.राजू शेट्टी, आमदार महादेवराव महाडिक, श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, माजी मंत्री छगन भुजबळ, डॉ.भालचंद्र कांगो, दिलीप पवार, सुधाकर रेड्डी आदींसह भाकपचे कार्यकत्रे व पानसरे यांचे चाहते तसेच नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून पार्थिवाचे दर्शन घेतले.
दुपारी तीन वाजता दसरा चौकातून अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. पंचगंगा स्मशानभूमी येथे पानसरे यांच्या पार्थिवावर सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी अंत्यसंस्कार झाले. यावेळी हजारोंच्या जनसमुदायाला अश्रू अनावर झाले होते.