सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे जागतिक स्तरावर नाशिकची ओळख- मुख्यमंत्री

0
12

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिक जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर अधोरेखित झाले आहे. येणारे कुंभमेळ्याचे पर्व साधू-महंतांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करताना शासनातर्फे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.बैठकीच्या प्रारंभी कॉ. गोविंद पानसरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीला पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे, महापौर अशोक मुर्तडक, सर्वश्री आमदार बाळासाहेब सानप, पंकज भुजबळ, राजाभाऊ वाजे, अपूर्व हिरे, डॉ.राहुल आहेर, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, उपमहापौर गुरुमितसिंग बग्गा, श्री कृष्णचरणदासजी, श्री नरसिंगदासजी, श्री राजेंद्रदासजी, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतिष शुक्ल, अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, श्री. भक्तीचरणदासजी, श्री. रामकिशोर शास्त्री, पोलीस गृहनिर्माण विभागाचे व्यवस्थापकीय संचालक अरुप पटनाईक, राजमाता जिजाऊ महिला बाल संस्थेच्या महासंचालक वंदना कृष्णा, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे आयुक्त विजयकुमार गौतम, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, विभागीय आयुक्त एकनाथ डवले आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कुंभमेळा यशस्वी झाल्यास नाशिकच्या नावलौकिकात भर पडणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे आणि सार्वमताने पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. कुंभमेळ्याचे नियोजन करताना परस्परांना सहकार्य करावे. साधू-महंतांच्या सुचनांचा आदर करून त्यांना आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल आणि कुंभमेळ्यासाठी विविध सुविधा निर्माण करताना शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल.

कुंभमेळ्याच्या तयारीसाठी असलेला कमी कालावधी लक्षात घेऊन विभाग आणि जिल्हा पातळीवर अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यामुळे विकासकामांबाबत आवश्यक प्रक्रियेला वेग येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्रशासनातर्फे स्वच्छतेबाबत खबरदारी घेण्यात येत असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, कुंभमेळा हे मोठे पर्व आहे. येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता स्वच्छतेबाबत नागरिकांनी जागरूक रहाणे गरजेचे आहे. तसेच राज्यातील सेवाभावी संस्थांनाही स्वच्छतेच्या कामात सहभागी करून घेण्यात यावे. कुंभमेळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेची जन चळवळ उभी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

या कुंभमेळ्यानंतर बारा वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी लगेच तयारी सुरू करण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, साधुग्रामसाठी कायम जागा अधिग्रहित करण्याबाबत तसेच कुंभमेळ्यासाठी प्राधिकरण स्थापण्याच्या साधू-महंतांच्या सुचनांचा निश्चितपणे विचार करण्यात येईल. जिल्ह्यात येणाऱ्या साधुंचे चांगले स्वागत होईल अशी व्यवस्था देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. कुंभमेळ्याची माहिती देशभर पोहोचविण्यासाठी ब्रँडिंगबाबतही आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. बाहेरून येणाऱ्या वाहनांसाठी प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या पार्किंग सुविधेबरोबरच खाजगी पार्किंग सुविधांचाही नियोजनात समावेश करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.

श्री. महाजन म्हणाले, कुंभमेळ्याचे आयोजन नाशिकसाठी आनंददायी आणि महत्वाचे कार्य आहे. कुंभमेळ्यात दुर्घटना घडू नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येत आहे. रामकुंडाच्या परिसराचे सुशोभिकरण आणि दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात येत आहे. कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी साधू-महंतांचे मार्गदर्शन व सहकार्य आवश्यक आहे. साधूग्रामसाठी कायमस्वरुपी जागा संपादन करण्याची प्रक्रिया येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल. कुंभमेळ्यात चांगली व्यवस्था निर्माण करून नाशिकचा नावलौकीक उंचावण्याचा प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात श्री. डवले यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनाविषयी माहिती दिली. आरोग्य सुविधा निर्माण करताना आयएमएचे तर आपत्ती व्यवस्थापनात यशदाचे सहकार्य घेण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आणि महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी विकासकामांविषयी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी वाहनांसाठी करण्यात येणाऱ्या व्यवस्थेची माहिती दिली. यावेळी साधू-महंतांनी विचार व्यक्त केले.