इंटरप्रिटीशन व कल्चरल सेंटरचा मास्टर प्लॅन तयार करा- हंसराज अहिर

0
7

चंद्रपूर : जिल्ह्यालाच नव्हे तर राज्याला अभिमान वाटेल असे इंटरप्रिटीशन व कल्चरल सेंटर चंद्रपूर शहरात करण्यासाठीचा मास्टर प्लॅन तयार करावा, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी पुरातत्व विभागाला दिले. विश्रामगृह येथे वाहतूक शाखा, पुरातत्व विभाग व माजी मालगुजारी (मामा) तलाव सिंचन प्रकल्प बंधारे याबाबत बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, ॲड. संजय धोटे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, जी.पी.गरड, अशोकसिंग ठाकुर आदी उपस्थित होते.

श्री. अहिर म्हणाले, ऐतिहासिक वारसा असलेल्या वस्तुंचे संग्रहालय करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 3.25 एकर जमीन दिली असून या ठिकाणी पुरातत्व विभागाने इंटरप्रिटीशन व कल्चरल सेंटर तयार करण्यासाठीचा मास्टर प्लॅन तयार करावा. सराई या ऐतिहासिक इमारतीची देखभाल दुरुस्ती व जतन महापालिकेने करावे. विरशा यांची समाधी असलेल्या अंचलेश्वर गेट या ठिकाणी बाग व सौंदर्यीकरण तसेच लाईट व साऊंड शो करावे.

जटपुरा गेट येथे वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेता पुरातत्व विभागाने पाहणी करुन वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी उपाय योजना करावी. चंद्रपूर जिल्हा कारागृह हे किल्ला इमारतीत आहे. कारागृह इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे व किल्ला पुरातत्व विभागाने जतन करावा. शहरातील परकोट दुरुस्ती जलद गतीने करण्यात यावी. यासोबतच भद्रावती किल्ला, बल्लारशा किल्ला व गडचिरोलीतील मार्कंडा मंदीर देखभाल दुरुस्ती प्राधान्याने करण्यात यावी.

यानंतर श्री. अहिर यांनी सिंचनासंबंधी आढावा घेतला. ते म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातील 218 गावातील मामा तलावाच्या दुरुस्तीचे काम या अभियानाअंतर्गत करावे. ज्या गावाला लागून नाला अथवा नदी आहे अशा ठिकाणी नाला व नदी खोलीकरणाची कामे हाती घेतल्यास सिंचन वाढीला फायदा होऊ शकतो सोबतच सिंगाडा व मच्छिमारी व्यवसाय करता येऊ शकतो. बंधारा बांधकामामध्ये काही नवे प्रयोग करुन सिंचन क्षमता वाढविता येते का याचा अभ्यास करण्याची गरज आहे. पाणी वापर संस्थाचे पुनर्गठन करण्यात यावे.