नागपूर येथे 4 जुलैपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

0
8

मुंबई(विशेष प्रतिनिधी)दि.01-विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 4 जुलै 2018 पासून राज्याची उपराधी नागपूरला होणार आहे. नागपूर येथे दरवर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत असते. पावसाळी अधिवेशन नागपूर येथे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शासनाच्या या निर्णयावर राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी शिक्कामोर्तब केला आहे.राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 174, खंड (1) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारात विधान भवन, नागपूर येथे ही बैठक बोलविली आहे. विधान सभेचे कामकाज 4 जुलै 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता सुरू होणार आहे. तर, विधान परिषदेचे कामकाज हे दुपारी 12.00 वाजता सुरू होणार आहे. याबाबतचे आदेश 31 मे रोजी राज्यपाल कार्यालयातून काढण्यात आले आहेत.

दरम्यान, पावसाळी अधिवेशन नागपुरातच होईल, असे संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी गेल्या आठवड्यात नागपुरात सांगितले होते. पावसाळी अधिवेशन पहिल्यांदाच नागपूरला होत असले तरी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. अधिवेशनाचे कामकाज तीन आठवडे होणार आहे. प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.दरम्यान, मुंबई येथील आमदार निवासाचे काम सुरू आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या काळात तिथे राहणे अवघड होईल. आताच आमदारांना भत्ता देण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळीसह हिवाळी अधिवेशनही नागपुरला घेण्यात येत आहे.