देशमुखांना विधान परिषदेच्या सभापतिपदावरून हटवण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली

0
10

मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांना विधान परिषदेच्या सभापतिपदावरून हटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्यांच्या जागी माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांना सभापतिपद देण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
विधान परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक २८ आमदार असून काँग्रेसची संख्या २० आहे. गेल्या हिवाळी अधिवेशनात देशमुख यांना हटवण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू झाले होते. त्यांनी अविश्वास प्रस्तावही मांडला होता. मात्र, आता मतदानाने देशमुख यांना हटवायचे, अशी रणनीती राष्ट्रवादीने आखली आहे. ठराव मांडण्यासाठी राष्ट्रवादीकडून मंगळवारी विधान परिषेदत दहा आमदार उभे राहणार आहेत, अशी व्यूहरचना पक्षाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुखांना हटवण्याच्या पक्षाच्या या भूमिकेला आधीच हिरवा कंदील दिला होता. सोमवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांच्या बैठकीत याबाबत व्यूहरचना आखण्यात आली. या ठरावानुसार अविश्वास प्रस्ताव सात दिवसांत किंवा चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात मतदानाला आल्यास देशमुख यांना पदावरून पायउतार व्हावे लागेल.

देशमुख यांना हटवण्याची धमकी देऊन विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घ्यायचे, असा राष्ट्रवादीचा डाव असल्याचे बोलले जात होते. पण, पक्षाला या पदात रस नसल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानसभेत एक आमदाराने का होईना काँग्रेसची संख्या जास्त असल्याने या कसरतीत न पडलेले बरे, अशी भूमिका नेत्यांकडून मांडण्यात आली. त्याऐवजी विधान परिषदेचे आपले हक्काचे सभापतिपद मिळवायचे, असा निर्धार राष्ट्रवादीने केला आहे.