तालिका अध्यक्ष जाहीर ,पोलीस ठाण्यातील गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई

0
12

विधानसभा इतर कामकाज…

मुंबई : विधानसभा सदस्य शिवाजीराव नाईक, योगेश सागर, विजय औटी, राहुल मोटे, सदस्या वर्षा गायकवाड यांची विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी या सदस्यांची निवड विधानसभेत जाहीर केली.

नवीन सदस्यांचा परिचय
विधानसभेचे नवनिर्वाचित सदस्य तुषार राठोड यांचा परिचय सभागृहाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला करून दिला.
विधानसभा प्रश्नोत्तरे :

मुंबई : नागपूर गिट्टी खदान पोलीस ठाण्यातील गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.

गिट्टी खदान (नागपूर) पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बनावट देयके सादर केल्याबाबतचा प्रश्न सदस्य चंद्रकांत सोनवणे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, पोलीस मोटार वाहन विभागातील दोन अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांनी स्पेअर पार्टचे बनावट खोटे दस्ताऐवज तयार केले. या गैरप्रकारातील दोषींवर व सहभागी असलेल्यांवरही कारवाई करण्यात येईल.

कोल्हापूर येथील रस्त्यांच्या कामाच्या मुल्यमापनासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती- मुख्यमंत्री

कोल्हापूर शहरात आयआरबी कंपनीने बांधलेल्या रस्त्यांच्या कामांचे मूल्यमापन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. यापूर्वी यासंदर्भात दिलेले दोन्ही अहवाल बाजूला ठेऊन ही नवीन समिती या कामांचे मूल्यमापन करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

कोल्हापूर शहरात रस्ते बांधताना आयआरबी कंपनीने युटीलिटी शिफ्टींगकडे दुर्लक्ष केल्याबाबतचा प्रश्न सदस्य सर्वश्री राजेश क्षीरसागर, आशिष शेलार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, या कंपनीने रस्ते करताना युटीलिटी शिफ्टींग संदर्भात काम करणे आवश्यक होते. याबाबत नंतर बदल का करण्यात आला त्याची चौकशी करण्यात येईल. आयआरबी कंपनीने रस्त्यांचे काम पूर्ण केले नसेल आणि तरीही टोल वसुली करण्यात येत असेल तर नव्याने नेमण्यात आलेली समिती त्या कामांचे मूल्यमापन करून तसा अहवाल उच्च न्यायालयास सादर करण्यात येईल.

काम अपूर्ण असेल तर उच्च न्यायालयाची परवानगी घेऊन टोल वसुलीला स्थगिती देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील रस्ते उभारणी करताना युटीलिटी शिफ्टींगबाबत एक धोरण तयार करण्याचे निर्देश देण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

भिवंडी परिसरातील 2200 हेक्टर जागेवर लॉजिस्टीक हब उभारणार- मुख्यमंत्री

भिवंडी परिसरातील 2200 हेक्टर जागेवर लॉजिस्टीक हब उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

भिवंडी (जि. ठाणे) परिसरातील मढवी कम्पाऊंडमध्ये भंगार गोदामाला लागलेल्या आगीसंदर्भातील प्रश्न सदस्य अजय चौधरी यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. या संदर्भातील एका उपप्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, याठिकाणी अस्तित्वात असलेल्या विविध गोदामांची छाननी करण्यात येत आहे. सुरक्षिततेचे उपाय करून ज्या गोदामांना नियमित करण्यात येते ते केले जातील. नियमात शिथिलता देऊनही जी नियमित करता येणार नाहीत, अशी गोदामे हटविण्यात येतील.

सदस्य सर्वश्री सुभाष पाटील, योगेश सागर यांनी चर्चेत भाग घेतला.

अकोला महानगरपालिकेच्या विकासासाठी विशेष बाब म्हणून सहकार्य करणार- अर्थमंत्री

अकोला महानगरपालिकेच्या विकासासाठी प्रस्ताव पाठवावा, त्यास विशेष बाब म्हणून सहकार्य करण्यात येईल व नागरी भागातील सोयीसुविधा, रस्त्यांकरिता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 5054 या लेखाशिर्षाखालील निधी ‘ड’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील नागरी भागातील रस्त्यांकरिता वापरण्यास परवानगी देण्याबाबतचा प्रश्न सदस्य गोवर्धन शर्मा यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. त्यावर अर्थमंत्र्यांनी प्रस्ताव पाठविण्यास सांगितले.