मेट्रो-3 कारशेडचे कार्यालय मनसे कार्यकर्त्यांनी फोडले

0
13

मुंबई- ‘मेट्रो-3’ प्रकल्पाअंतर्गत मार्गात येणार्‍या झाडांची कत्तल करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध केला आहे. एवढेच नव्हे तर आरे कॉलनीत ‘मेट्रो-3’ कारशेड कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड तोडफोड केल्याची माहिती मिळाली आहे. तसेच गोरेगावमधील मराठी लोकांची घरे पाडून ‘मेट्रो-3’ प्रकल्प पूर्ण केला जात असल्याचा मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला आहे.
म‍िळालेली माहिती अशी की, आरे कॉलनीतील झाडे तोडल्याच्या संतापातून मनसे कार्यकर्त्यांनी मेट्रो-3 कारशेड कार्यालयात घुसून तोडफोड केली. दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी मराठी माणसाच्या थडग्यावर मुंबईचा विकास होऊ देणार नसल्याचे वक्तव्य केले होते.

मुंबई मेट्रो प्रकल्प होणार नाही, आरे कॉलनी तोडू देणार नाही. आरे कॉलनी तोडण्यास विरोध हा राजकीय विषय नसून तो मराठी माणसाचा अस्तित्वाचा विषय आहे असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते. मुंबई ही मराठी माणसाची आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या पाठीशी मनसे सदैव उभा राहाणार असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मेट्रो-3 कारशेडच्या कार्यालयावर हल्ला केल्याची माहिती म‍िळाली आहे.